ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत भरपावसात धडक महामोर्चा!

अंतिम निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार
​जाती-जातींमध्ये दरी निर्माण करू नका; उपवर्गीकरणाच्या विरोधात हजारो कार्यकर्त्यांचा मुंबईत एल्गार

बेणसे-रायगड (चंद्रकांत अडसुळे) :- अनुसूचित जाती (एस.सी.) आरक्षणात उपवर्गीकरण झाले तर जाती-जातींमध्ये मोठी दरी निर्माण होईल. सरकार यामध्ये केवळ राजकारण करून भांडणे लावण्याचे काम करत आहे. त्यामुळे जोपर्यंत ही आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा ठाम निर्धार मुंबईत आयोजित महामोर्च्यात करण्यात आला.

​अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी रिपब्लिकन सेना, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भीम आर्मी, चर्मकार विकास संघ, भारिप बहुजन समाज संघटना, आगरी समाज संघटना आणि विविध अनुसूचित जाती संघटनांच्या वतीने मुंबईत एका भव्य महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. मुसळधार पाऊस सुरू असतानाही राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा महामोर्चा सुरुवातीला मेट्रो सिनेमा येथून सुरू झाला आणि पुढे मुंबई महापालिकेच्या रस्त्यावर आला, जिथे त्याचे रुपांतर एका जाहीर सभेत झाले. मुळात हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते विधानभवनापर्यंत काढण्यात येणार होता, परंतु पोलिसांनी विधानभवनाकडे जाण्यास परवानगी नाकारल्यामुळे तो मुंबई महापालिकेपर्यंतच काढण्यात आला.

​या महामोर्च्याचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले. भरपावसात पार पडलेल्या या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत सरकारवर घणाघाती निशाणा साधला. याप्रसंगी आनंदराज आंबेडकर, माजी आमदार बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, डॉ. भीमराव आंबेडकर, जयदीप कवाडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, नागपूरचे आमदार संजय मेश्राम, राजू थाटे, जयाताई बनसोडे, ॲड. आमनदादा आंबेडकर, अनुसूचित जाती आरक्षण व उपवर्गीकरण समितीचे ॲड. सुरेश माने, राहुल डंबाळे, शांताराम कारंडे, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, शेखर भगत, ढोर-कडक्कया समाजाचे नामदेव सदाशिव, भीमराज सेनेचे राजाभाऊ थाटे, ॲड. प्रकाश कांबळे, चर्मकार विकास महासंघाचे अध्यक्ष संजय खामकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे, चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा प्रियंका गजरे, सम्यक सामाजिक संस्थेचे चंद्रकांत अडसुळे, तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि भीम आर्मीचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे एस. के. भंडारे यांनी केले.

​या आंदोलनादरम्यान "जाती-जातींमध्ये भांडणे लावणे बंद करा", "बदर समितीचा अहवाल रद्द करा", "उपवर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा डाव हाणून पाडू", "आता आमचे एकच ध्यान, वाचवू बाबासाहेबांचे संविधान" आणि "निळ्या वादळाचा एकच निर्धार, आरक्षणातील फुटीरतेला आमचा नकार" अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी भरपावसातही संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. उपवर्गीकरणाच्या या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी राज्यभर 'उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती' स्थापन करण्यात आली असून, आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभारले जाईल आणि सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला.

​दरम्यान, सायंकाळच्या सुमारास आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सात ते आठ सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. तेथे सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे शिष्टमंडळ पुन्हा सभास्थळी परतले. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांसोबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. आपण सध्या अर्धी लढाई जिंकलो आहोत; मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत आपला संघर्ष थांबणार नाही. उपवर्गीकरण पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे सांगत त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभारण्याचे आणि गरज पडल्यास राज्यव्यापी संघर्ष छेडण्याचे आवाहन केले. भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, चर्मकार महासंघ, होलार समाज, ढोर आणि आगरी अशा विविध समाजांतील बांधव या संघटित लढ्यात मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

Comments

Popular posts from this blog