आश्वासन हवेतच; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था!
खड्ड्यांमुळे कोकणवासीयांचा प्रवास पुन्हा खडतर
बेणसे-रायगड, दि. ८ (चंद्रकांत अडसुळे) :- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जून महिन्यापर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे उर्वरित काम पूर्ण होऊन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास निर्विघ्न होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. मात्र, जुलै महिना उजाडला तरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही, उलट अपूर्ण काम असलेल्या ठिकाणी रस्त्याची मोठी दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम संथ गतीने आणि अपूर्णावस्थेत सुरू असून, या वर्षी तरी हे काम पूर्ण होऊन कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल अशी मोठी अपेक्षा होती. परंतु, ठेकेदारांच्या कमालीच्या निष्क्रियतेमुळे याही वर्षी कोकणची वाट खडतरच असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सद्यस्थितीत नागोठणे आणि गडब परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, उड्डाणपूल व अन्य पुलांची कामेही रखडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागोठणे जवळील कोलेटी येथे उड्डाणपुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र ते मुदतीत पूर्ण झाले नाही आणि सध्या हे काम लवकर पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या अपूर्ण कामामुळे प्रवाशांना सक्तीने सर्व्हिस मार्गाचा वापर करावा लागत आहे, ज्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमधील खडी वर आली असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळण्याचे आणि ती नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अशीच काहीशी परिस्थिती वडखळ येथून अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस मार्गिकेची झाली आहे. प्रशासनाने पेव्हर ब्लॉक बसवून या मार्गाची तात्पुरती मलमपट्टी केली होती, मात्र मुसळधार पावसामुळे आता हे पेव्हर ब्लॉक खचून ठिकठिकाणी पुन्हा धोकादायक खड्डे तयार झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या वाहनचालकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गडब परिसरातही महामार्गाची पुरती दुर्दशा झाली असून, महामार्ग प्राधिकरणाचे नियोजनशून्य कामकाज चव्हाट्यावर आले आहे. प्राधिकरणाने सिमेंटच्या रस्त्यावर घाईघाईने डांबरीकरण करून खड्डे भरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता, पण पहिल्याच पावसाच्या माऱ्यात हे डांबरीकरण पूर्णपणे वाहून गेल्याने रस्ता पुन्हा मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाला आहे. दरम्यान, महामार्गावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पहिल्या पावसापासून निर्माण झालेली ही गंभीर समस्या अद्यापही कायम असून, वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या साचलेल्या पाण्यातून दुचाकी, रिक्षा, कार आणि अवजड वाहने मार्ग काढत असल्याने दिवसभर वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण होत असून, अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित प्रशासनाने रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून आणि खड्डे बुजवून सुरक्षित वाहतुकीसाठी तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र आणि आक्रमक मागणी आता स्थानिक नागरिकांसह कोकणवासीयांकडून केली जात आहे.

Comments
Post a Comment