नांदेडच्या मुखेड तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिके करपली!
बळीराजाचे डोळे पुन्हा आभाळाकडे
मुखेड-नांदेड, दि. १६ (निकीता गायकवाड) :- गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्णपणे दडी मारल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दुष्काळसदृश भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी कडक ऊन पडत असल्याने शेतातील पिके करपू लागली असून बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर शेतकर्यांनी मोठ्या आशेने पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ खंडामुळे आता पिकांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तालुक्यातील मूग, उडीद, तूर आणि सोयाबीन यांसारखी महत्त्वाची पिके तीव्र उन्हाच्या तडाख्याने वाळू लागली असून, वाढ खुंटल्यामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत पडले आहेत.
जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगा आणि कोमेजून चाललेली पिके अशी विदारक स्थिती सध्या मुखेड तालुक्यातील बहुतांश भागात पाहायला मिळत आहे. कोवळी पिके वाचवण्यासाठी शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु ढगाळ वातावरण निर्माण होऊनही पाऊस पडत नसल्याने त्यांची निराशा होत आहे. "मुग, उडीद, तूर, सोयाबीन व इतर पिकांची अति उन्हाच्या तडाख्याने पिके वाळत आहेत, शेतकरी ढगाकडे बघत पावसाच्या आगमनाची वाट बघत असून त्यांचे डोळे ढगाकडे लागले आहेत," अशी आर्त हाक सध्या येथील ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे. पाण्याअभावी पिके हातातून जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला असून, कृषी विभागाने तातडीने या परिस्थितीची पाहणी करून योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Post a Comment