अतिवृष्टीत पंकज तांबे मित्रमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर!
वाढदिवस टाळून सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप, शेतकऱ्यांना मार्गदर्शन
साई-माणगाव (हरेश मोरे) :- स्वराज्य संघटनेचे संस्थापक तथा शेतकरी नेते पंकज तांबे यांच्या वाढदिवसा निमित्त कोणताही वैयक्तिक उत्सव किंवा जल्लोष न करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे समाजाचे ऋण फेडण्याचा आदर्श संदेश देण्यात आला. पंकज तांबे मित्र मंडळाच्या पुढाकारातून माणगाव तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमधून विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, कष्टकरी आणि गरजू घटकांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.
यासाठी मित्र मंडळाचे पदाधिकारी मुकुंद वाढवळ, स्वप्निल शिर्के, प्रवीण पाकुर्डे, सुनील अर्बन, दिनेश केकाने, महादेव जाईकर, रुपेश वाढवळ, रणधीर कनोजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत बमणोली हायस्कूल, कळमजे जि. प. शाळा, साई, जि. प. शाळा, मांगवली जि. प. शाळा, राजीवली जि. प. शाळेसह तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या, लेखन सामग्री, छत्र्या तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लागावा आणि त्यांच्यामध्ये शिक्षणा विषयी प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अनेक शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. याच बरोबर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. उपचार घेत असलेल्या रुग्णांना मानसिक आधार मिळावा आणि त्यांच्या आरोग्य सुधारणेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या भावनेतून हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे पंकज तांबे मित्र मंडळाकडून दरवर्षी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
पडत्या पावसातही मित्र मंडळाचे कार्यकर्ते दिवसभर विविध ठिकाणी धावपळ करत हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटत होते. समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची त्यांची तळमळ आणि सामाजिक कार्याप्रती असलेली निष्ठा या माध्यमातून दिसून आली. शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळख निर्माण केलेले पंकज तांबे हे केवळ निवेदनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. लावणी, नांगरणी, पेरणी, कापणी अशा प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी ते प्रत्यक्ष शेतात जातात. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे भात बियाणे उगवले नाही, तर काही भागांत अतिवृष्टीमुळे कोवळे भाताचे अंकुर वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पंकज तांबे यांनी विविध गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यांना धीर दिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून पंकज तांबे यांच्याकडे पाहिले जाते. शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी आणि गरजू घटकांच्या सेवेतच खरा वाढदिवस साजरा होतो, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. त्यांनी विविध शाळांना तसेच शेतकऱ्यांना स्वखर्चातून फळझाडांची रोपे उपलब्ध करून दिली. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. समाजहिताचे उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमा मधून देण्यात आला.



Comments
Post a Comment