NEET पेपरफुटी व लडाखच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा तीव्र निषेध!
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ईश्वरपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
वाळवा-सांगली, दि. २५ (प्रतिनिधी) :- दिल्ली येथील जंतर-मंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाकडून झालेला अमानुष लाठीचार्ज तसेच त्यांना दिलेली वागणूक अतिशय भयावह असून ही कृती लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. लेह-लडाखच्या घटनात्मक व संविधानिक अधिकारांसाठी तसेच नीट (NEET) परीक्षा घोटाळा व पेपरफुटीप्रकरणी लाखो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत ठोस सुधारणा व्हाव्यात या मुख्य मागण्यांसाठी गेल्या ३० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक व कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांचा सत्याग्रह असंविधानिक व गैरमार्गाने मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीचा व असंविधानिक धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने सांगली जिल्हाध्यक्ष विनोद आढाव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी, ईश्वरपूर यांना निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या कारभाराचा जाहीर निषेध नोंदवला.
इंग्रजांच्या क्रूर राजवटीतही जेव्हा एखादा देशभक्त उपोषणाला बसायचा, तेव्हा त्यांची हुकूमशाहीसुद्धा थरथरायची; परंतु आज स्वतंत्र भारताच्या लोकशाहीत उद्ध्वस्त होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, शिक्षण व्यवस्थेच्या स्वच्छतेसाठी आणि संविधानिक अधिकारांसाठी प्राणाची आहुती लावून लढणाऱ्या जागरूक नागरिकांच्या जगण्या-मरण्याबाबत सरकार पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील लोकशाही हळूहळू राजेशाहीत बदलू लागली असून संपूर्ण देश हुकूमशाहीकडे झुकत आहे, तसेच राजकीय बळाच्या जोरावर संविधानिक आंदोलने चिरडून टाकून देशात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र भारतात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली असून सत्तेचा उघडपणे व बेजबाबदारपणे गैरवापर सुरू आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या गंभीर मुद्द्यावर केंद्र सरकारने आपली धोरणात्मक व नैतिक जबाबदारी स्वीकारावी, भ्रष्ट व बेजबाबदार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. शासनाने या निवेदनाची अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. हे निवेदन देताना संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे (भाऊ), धनाजी तुपारे, सागर घेवदे, अमर सातपुते, संतोष मोरे, शुभम कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment