रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला!
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; उरण, पनवेल आणि खालापूरमध्ये मुसळधार पूरपरिस्थिती
वाहतूक ठप्प, नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू
रायगड, दि. ५ जुलै (विशेष प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आज सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यात सरासरी २११.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस उरण तालुक्यात ३२६ मिमी, पनवेलमध्ये ३०२.५० मिमी आणि खालापूर तालुक्यात ३२२ मिमी इतका नोंदवला गेला असून, उर्वरित सर्व तालुक्यांमध्येही १५० मिमीपेक्षा जास्त पावसाची अतिवृष्टी झाली आहे. या संततधारेमुळे अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी ११ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून हेटवणे मध्यम प्रकल्प ३२.८० टक्के भरला आहे.
या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला असून अनेक मुख्य मार्ग बंद झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भिसे बस स्टॉपजवळ कॅनॉलच्या पाण्याची पातळी वाढल्याने आणि सुकेळी खिंडीतील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अंबा नदीचे पाणी वाढल्याने पाली पुलावरून, तर बाळगंगा नदीची पातळी वाढल्याने दुरशेत-खरोशी रस्त्यावर पाणी आले आहे. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरोली ब्रिज आणि जुन्या मुंबई-पुणे हायवे व एक्सप्रेसवे कनेक्टर रोडवर पूर आल्याने येथील वाहतूक खोपोलीमार्गे वळवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मुरुड, अलिबाग, कर्जत आणि श्रीवर्धन तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्ते व पुलांवर पाणी साचल्याने किंवा झाडे पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात रेल्वे मार्ग मात्र अजूनही सुरळीत सुरू आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये काही दुर्घटनाही समोर आल्या असून, ३ जुलै रोजी पांडवकडा धबधबा येथे पाण्याचा प्रवाहात वाहून गेलेल्या तळोजा येथील मोहम्मद नौशाद मोहम्मद साहिल आणि सांताक्रूझ येथील शॅनन गॅप्स किनी या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच कर्जत तालुक्यात एका पशुधनाचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मुरुड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, माणगाव आणि पनवेल तालुक्यांत अनेक घरांचे, गोठ्यांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे आणि पूरस्थितीमुळे मौजे वडघर सोनारवाडी, पनवेल कोळीवाडा, कर्जत तालुक्यातील शेलू आणि मुरुडमधील विविध गावांमधून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रोहा तालुक्यातील बाहे येथे कुंडलिका नदीच्या पुरात अडकलेल्या २० युवकांना स्थानिक पथकाने सुरक्षित बाहेर काढले, तर आपटा-रसायनी मार्गावर पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. रोहा आणि अलिबाग परिसरातील वीज खांब पडल्याने व उपकेंद्रात पाणी शिरल्याने सुमारे ७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सध्या सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क व सक्रिय असून पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Post a Comment