पूर ओसरताच रोह्यात स्वच्छता मोहिमेला वेग!
बाधित १,४०० नागरिकांना नगरपालिकेकडून जेवण
रोहा-रायगड, दि. ८ (प्रतिनिधी) :- गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसानंतर आलेल्या महापुरामुळे रोहा शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मध्यरात्री घरांमध्ये व दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर भिजलेल्या साहित्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली होती. मात्र मंगळवारी पावसाने उसंत घेताच रोहा नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला वेग देत शहर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले.
नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवरील कचरा हटविणे, नाल्यांची साफसफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ व आवश्यक यंत्रसामग्री तैनात करण्यात आल्याने स्वच्छतेच्या कामाला गती मिळाली असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळत आहे.
अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अष्टमीतील खालचा मोहल्ला, कोळीवाडा, कासार आळी, मराठा आळी, त्रिमूर्ती नगर, शिवकृपा, धनलक्ष्मी परिसर, रोहा बाजारपेठ, धनगर आळी आदी भागांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये शिरले होते. काही ठिकाणी तब्बल तीन फूट पाणी साचल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर डास व साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व भागांत औषध व धूर फवारणी करण्यात आली.
पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रोहा नगरपालिकेने सुमारे १,४०० बाधित नागरिकांना अन्नाची व्यवस्था करून दिली. या मदतकार्याबरोबरच शहरातील स्वच्छता व आरोग्य सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
स्वच्छतेसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक - नगराध्यक्षा वनश्री शेडगे
"पूरानंतरची स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच आरोग्याची काळजी घेत पाणी उकळूनच प्यावे," असे आवाहन रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी केले.


Comments
Post a Comment