स्वामी समर्थ मंदिरालगत हॅझर्डस केमिकलच्या डंपरांचा अड्डा!
नागरिकांच्या जीवाशी सुरू 'केमिकल' खेळ; राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष?
अष्टमी ग्रामस्थांचा गंभीर आरोप; अपघातानंतरही कारवाईचा अभाव
...इथे पण 'डंपर'ची दहशत?
रोहा-रायगड, दि. ४ (विशेष प्रतिनिधी) :- अष्टमी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रालगत आणि सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी Hazardous Material वाहतूक करणाऱ्या अवजड डंपरांचा दिवस-रात्र सुरू असलेला अड्डा आता नागरिकांच्या जीवावर उठल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नुकत्याच हॅझर्डस केमिकल वाहून नेणाऱ्या एका वाहनाच्या भीषण अपघातात एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला. तरीही प्रशासनाने धडा न घेतल्याने संतप्त नागरिकांनी थेट रोहा नगर परिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राशेजारी आणि घनदाट वस्तीच्या परिसरात धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे Hazardous Waste Chemical भरलेले डंपर नियमितपणे उभे केले जातात. या वाहनांतून येणाऱ्या तीव्र रासायनिक दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक, महिला, लहान मुले तसेच मंदिरात येणारे भाविक त्रस्त झाले आहेत. अनेकांना मळमळ, डोकेदुखी आणि श्वसनाचा त्रास होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी दिलेल्या तक्रारपत्रावर २५ हून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या धोकादायक वाहनांचे पार्किंग तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत नगर परिषद आरोग्य सभापतीलाही देण्यात आली आहे.
अपघातानंतरही प्रशासनाला जाग नाही
हॅझर्डस केमिकल वाहून नेणाऱ्या वाहनांच्या निष्काळजीपणामुळे नुकताच एका निष्पाप तरुणाचा जीव गेला. एवढी गंभीर घटना घडूनही अशा वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
'राजकीय वरदहस्त' असल्याने कारवाई नाही?
या डंपरांना काही राजकीय व्यक्तींचे संरक्षण असल्यामुळे संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितापेक्षा राजकीय दबावाला महत्त्व दिले जात असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
नागरिकांचा सवाल
धोकादायक रसायनांनी भरलेले डंपर मंदिरालगत आणि लोकवस्तीमध्ये उभे राहत असतील, तर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, ही 'डंपर'ची दहशत अशीच कायम राहिल का? असा संतप्त सवाल अष्टमीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.


Comments
Post a Comment