मधमाशा पालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
शेतकरी व सर्वसामान्यांसाठी सुवर्ण संधी
अलिबाग-रायगड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना' संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दि.18 जून 2019 च्या शासन निर्णय नुसार कार्यान्वित आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकरी आणि सर्वसामान्य मधपाळांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा असून मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना शेतकरी व सर्वसामान्यांसाठी सुवर्ण संधी असल्याची माहिती प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रायगड-अलिबाग यांनी दिली आहे.
मधमाशी पालनाचे मुख्य फायदे : आर्थिक उत्पन्न: मध आणि मेणाची विक्री करून उत्तम नफा मिळतो. शेती पिकांमध्ये वाढ: मधमाश्या परागीभवन करतात, ज्यामुळे पिकांचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी उत्पन्न वाढते. उद्योगाची निर्मिती: रॉयल जेली, प्रोपोलिस आणि मधमाशांचे विष या मौल्यवान उत्पादनांची विक्री करता येते. कमी खर्च: या व्यवसायासाठी खूप कमी जागा आणि भांडवल लागते.पूरक व्यवसाय: शेतीसोबत हा व्यवसाय सहज करता येतो.
योजनेचे स्वरूप आणि लाभ : या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षण, मधमाशा पालन व्यवसायासाठी आवश्यक साहित्य, मधपेट्या, मधमाशी वसाहत आणि मधयंत्रांचा पुरवठा केला जातो. या व्यवसायासाठी 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात आणि 50 टक्के रक्कम लाभार्थीचा हिस्सा (स्व: गुंतवणूक) असे अर्थसहाय्याचे स्वरूप आहे.
प्रशिक्षण आणि जनजागृती : जनजागृती शिबीर: मध उद्योगाच्या प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर 1 दिवसाची जनजागृती शिबिरे आयोजित केली जातील, ज्यामध्ये प्रत्येक मेळाव्यात 50 शेतकरी/मधपाळ सहभागी होऊ शकतात. मधपाळ प्रशिक्षण: मधपाळांना 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल. राहण्याची व जेवणाची सोय मंडळातर्फे विनामूल्य केली जाईल. प्रशिक्षण हे 50 टक्के स्व: गुंतवणूक रक्कम कार्यालयाकडे जमा केल्यानंतर सुरू करण्यात येईल. प्रगतीशील मधपाळ प्रशिक्षण: प्रगतीशील मधपाळ किंवा संस्थेच्या सदस्यांना महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 20 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल. राहण्याची व जेवणाची सोय मंडळातर्फे विनामूल्य केली जाईल. प्रशिक्षण हे 50 टक्के स्व: गुंतवणूक रक्कम कार्यालयाकडे जमा केल्यानंतर सुरू करण्यात येईल.
पात्रतेच्या अटी :- वैयक्तिक मधपाळ: अर्जदार साक्षर असावा, वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच, मान्यताप्राप्त केंद्रात 10 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. प्रगतीशील मधपाळ: वय 21 वर्षांपेक्षा जास्त, किमान दहावी उत्तीर्ण आणि स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावे किमान एक एकर शेतजमीन (मालकीची किंवा भाडेतत्त्वावर) असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे प्रशिक्षण देण्याची सुविधा असावी. संस्था: संस्था नोंदणीकृत असावी, किमान 1 एकर शेतजमीन असावी आणि प्रशिक्षण केंद्रासाठी किमान 500 चौ.फूट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी.
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, 7/12 आणि 8-अ चा उतारा (असल्यास), बँक पासबुकची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, विहित नमुन्यातील अर्ज.
या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड यांच्याद्वारे केली जात असून, अधिक माहितीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्जासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क :- जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड. पत्ता: जिल्हा उद्योग केंद्र इमारत (District Industries Centre), ठिकरुळ नाका, रायगड बाजारजवळ, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक : 02141-222642 मोबाईल क्रमांक : दर्शन ठोके (मधुक्षेत्रिक) 8356051494, ईमेल आयडी : dvioraigad@mskvib.org

Comments
Post a Comment