भारतीय संविधानाचा संदेश घेऊन बार्टीची 'संविधान दिंडी' पंढरपूरकडे रवाना
विठूरायाच्या दारी 'बार्टी'ची मूल्यजागृती; आषाढी एकादशीला होणार समारोप
वारीतून घुमणार संविधानाचा गजर
बेणसे-रायगड, दि. १३ (चंद्रकांत अडसुळे) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'संविधान दिंडी'चे उद्घाटन संस्थेच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. पुण्यातील नाना पेठ येथून या दिंडीचा शानदार शुभारंभ झाला. या प्रसंगी विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, विभागप्रमुख रवींद्र कदम, विभागप्रमुख शुभांगी पाटील-कदम, पुण्याचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासह बार्टीचे विविध अधिकारी, कर्मचारी आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेची मूलभूत मूल्ये, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय यांचा व्यापक प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून 'बार्टी'च्या वतीने ही संविधान दिंडी नियमितपणे आयोजित केली जात आहे. ही दिंडी देहू-आळंदी ते पंढरपूर या मार्गावर प्रवास करते. यावर्षीही अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या रथावर भारतीय संविधानाची उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज व इतर संत आणि महापुरुषांचे विचार तसेच संविधानातील मानवी मूल्ये प्रभावीपणे प्रदर्शित करण्यात आली आहेत. वारीच्या काळात लाखो वारकरी आणि नागरिकांमध्ये संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी या दिंडीदरम्यान पथनाट्य, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, मोफत उद्देशिका वाटप, तसेच "चालता-बोलता संविधान" यांसारख्या विविध लोकजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. बबन जोगदंड यांनी सांगितले की, संविधानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकशाही मूल्ये अधिक दृढ करणे हाच या संविधान दिंडीमागील प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर आपल्या उद्घाटनाच्या भाषणात निबंधक डॉ. सुचिता शिंदे यांनी, ही दिंडी जनमानसात संवैधानिक मूल्ये रुजविण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी संवैधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार करत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी या दिंडीचा समारोप होणार आहे.
पुण्यातील या उद्घाटन सोहळ्यानंतर शाहीर आनंद कीर्तने व त्यांच्या संचाने भक्तीमय आणि संविधानिक गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. बार्टीच्या 'समतादूत' विभागाचा या दिंडीमध्ये विशेष सहभाग असणार असून, त्यांच्या माध्यमातून वारीच्या वाटेवर ठिकठिकाणी वारकऱ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप केले जाईल. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समतादूतच्या प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांच्यासह कीर्ती आखाडे, तेजस्विनी कांबळे, उषा कांबळे, संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी, अनिता दहीकांबळे, भारती अवघडे आणि शशिकांत जाधव हे विशेष परिश्रम घेत आहेत. तसेच या उद्घाटन कार्यक्रमाला बार्टीमधील अधिकारी व कर्मचारी उषा भिंगारे, रजनी वाघमारे, गौरी सोनवणे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यातून पंढरपूरकडे रवाना झालेल्या या संविधान दिंडीचे ठिकठिकाणी अनेक मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत व कौतुक होत आहे.


Comments
Post a Comment