YTIET कर्जत येथे करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळाले उच्च शिक्षणाचे धडे; गुणवंतांसह पालकांचाही गौरव
कर्जत, दि. १७ (प्रतिनिधी) :- सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (YTIET), कर्जत येथे "करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६" मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या विविध संधी, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत अचूक दिशा मिळावी, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या मुख्य प्रेरणेने आयोजित या सोहळ्याला सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. पराग ओला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नसरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. जयवंती जनार्दन कोलंबे, उपसरपंच श्री. अंकुश गोविंद बागडे, सदस्या सौ. रीना रवींद्र धस, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. उत्तम चंदू कोलंबे, माजी सरपंच श्री. राम कमळू कोलंबे आणि मान्यवर वक्त्या सौ. स्वप्ना कुंभार देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी YTIET चे प्राचार्य डॉ. निलेश पवार होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व प्रगती, तांत्रिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून दिले. बदलत्या काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांनी योग्य करिअरची निवड करावी आणि स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मार्गदर्शनादरम्यान अभियांत्रिकी शिक्षणाच्या विविध शाखा, प्रवेश प्रक्रिया, शासकीय शिष्यवृत्ती योजना, रोजगाराच्या संधी आणि उद्योग क्षेत्रातील वाढत्या मागण्या याविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे मान्यवरांनी अभ्यासपूर्ण निरसन केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या सत्कार सोहळ्यात बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आपल्या पाल्यांचे यश पाहून भारावलेल्या पालकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. हरीश बरापात्रे, प्रा. समाधान पाटील, प्रा. रवींद्र जाधव, प्रा. योगिता जांभळे आणि डॉ. संतोष वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. सुजाता जगताप, प्रा. राजन नेमाडे, श्री. रामदास बागडे आणि श्री. सदाशिव मुने यांनी समन्वयक म्हणून कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले. या यशस्वी आयोजनामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना करिअरची योग्य दिशा मिळाली असून, YTIET संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment