ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान! अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू... मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान, पंचनामे सुरू 🚨

उणेगाव जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
ढोल-ताशांच्या गजरात नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत!


लोणेरे-माणगाव, दि. १८ (राम भोस्तेकर) :- रायगड जिल्हा परिषदेची उत्कृष्ट शाळा म्हणून ओळख असलेल्या उणेगाव जिल्हा परिषद शाळेत १५ जून २०२६ रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. विशेष म्हणजे, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती नोंदविण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर झाली. शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे औक्षण करून तसेच कुंकवाच्या ताटात पाय ठेवून त्यांच्या पाऊलखुणा कागदावर उमटवत अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

उणेगाव शाळेचा वाढता शैक्षणिक दर्जा आणि आधुनिक सुविधा यामुळे यंदा केवळ उणेगावच नव्हे, तर परिसरातील इतर गावांमधूनही अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत गणवेश आणि नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन पुस्तकांचा सुवास आणि नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दुपारच्या मध्यान्ह भोजनात सर्व विद्यार्थ्यांना गोड बुंदीचे लाडू देण्यात आले. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.
कार्यक्रमाला गोरेगाव बिटाचे विस्तार अधिकारी कुमार खामकर यांनी विशेष उपस्थिती लावून शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माता-पालक संघाचे प्रतिनिधी, शिक्षकवृंद, प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि आधुनिक सुविधा यांमुळे उणेगाव जिल्हा परिषद शाळा आज परिसरातील आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते,” अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.

Comments

Popular posts from this blog