वसई-विरार येथे कामगार नेते सचिन इंगळे (सनीभाऊ) व रिना जाधव यांचा अनाथ मुलांसोबत अनोखा वाढदिवस साजरा!
अन्नदान आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
वसई-विरार, दि. ४ (प्रतिनिधी) :- येथील मराठा लाईफ फाउंडेशन अनाथ आश्रमामध्ये नुकताच एक अत्यंत कौतुकास्पद आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सोहळा पार पडला. शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य कोकण प्रमुख सचिन इंगळे (सनीभाऊ) आणि महिला संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष रिना जाधव यांचा वाढदिवस या अनाथ आश्रमातील मुलांसोबत अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात साजरा करण्यात आला. नेहमीच्या थाटामाटात वाढदिवस साजरा न करता, समाजातील वंचित आणि अनाथ घटकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी आश्रमातील अनाथ मुलांची आणि तिथे राहणाऱ्या इतर व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
वाढदिवसाचे औचित्य साधून याठिकाणी उपस्थित सर्व गोरगरिबांना आणि अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले. वाढदिवसाचा मुख्य आनंद हा केवळ औपचारिकतेत न ठेवता सनीभाऊ आणि रिनाताई यांनी स्वतः या मुलांसोबत बसून भोजन केले आणि त्यांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी ऐकून घेतल्या. या संपूर्ण सोहळ्यामध्ये सांस्कृतिक रंगांची उधळण पाहायला मिळाली. सनीभाऊंनी आश्रमातील लहान मुलांसोबत आणि तिथे उपस्थित असलेल्या थोर-मोठ्या माणसांसोबत मनसोक्त नृत्य केले. यावेळी पारंपारिक लेझीमची गाणी आणि इतर उत्साहवर्धक गाण्यांवर सर्वांनी ठेका धरला होता. लहान मुलांसोबत गाणी गाणे, नाचणे आणि विविध खेळ खेळल्यामुळे अनाथ आश्रमातील वातावरण भारावून गेले होते. सनीभाऊंनी या मुलांसोबत भरपूर वेळ घालवत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले, ज्यामुळे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
या भव्य आणि कौतुकास्पद सोहळ्याला अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने महिला संघर्ष समितीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष दर्शनाताई सचिन इंगळे, रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. शिल्पाताई जैन तसेच मराठा लाईफ फाउंडेशनचे मुख्य ट्रस्टी लोखंडे साहेब आवर्जून उपस्थित होते. याशिवाय स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि सनीभाऊंचा मोठा मित्रपरिवार या सोहळ्याला साक्षीदार म्हणून उपस्थित होता. उपस्थित सर्वच मान्यवरांनी सचिन इंगळे आणि रिना जाधव यांच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करून त्यांचा वाढदिवस सार्थकी लावल्या बद्दल संपूर्ण वसई-विरार परिसरातून या दोन्ही नेत्यांवर आणि त्यांच्या मित्रपरिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोहळ्याच्या शेवटी सर्वांनी दोन्ही वाढदिवस मूर्तींना दीर्घायुष्य आणि भावी राजकीय व सामाजिक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


Comments
Post a Comment