ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

प्रशीक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम
ग्रामीण भागातील २० गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजारांची आर्थिक मदत!

​बेणसे-रायगड, दि. ३० (चंद्रकांत अडसुळे) :- शासकीय, निमशासकीय, मंत्रालयीन, बँकिंग आणि खासगी क्षेत्रातील निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन 'प्रशीक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था (रजि.) महाराष्ट्र राज्य' या संस्थेची स्थापना केली आहे. गेल्या चार वर्षांपासून ही संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्ये सातत्याने करत आहे. यामध्ये पूरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप, आरोग्य शिबिरे आयोजित करणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत देणे अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश आहे.

​दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्थेने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील, ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब व दुर्बल आहे, अशा कुटुंबांतील विद्यार्थ्यांची मदतीसाठी निवड केली. शालांत परीक्षेत म्हणजेच इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये ८०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या अशा २० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी संस्थेमार्फत प्रत्येकी १० हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांना मदत व भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा धनादेश वाटपाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर येथील चंद्रमणी बुद्ध विहार येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आय.ए.एस. (IAS) अधिकारी डॉ. कैलास पगारे, सेवानिवृत्त न्यायमूर्ती मिलिंद डोंगरे, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एस. ए. ससाणे, डॉ. इनकर आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी एस. डी. मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. कैलास पगारे यांनी प्रशीक संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि संस्थेला 'संकल्प निधी' म्हणून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

​या कार्यक्रमाला प्रशीक संस्थेचे कार्याध्यक्ष व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी बी. डी. जाधव, उपाध्यक्ष यशवंत भालेराव, सरचिटणीस आर. एन. गरुड, खजिनदार बी. डी. निकुंभ (सर्व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी), सहचिटणीस विजय थुले (सेवानिवृत्त तहसीलदार), सदस्य सुरेश धांडे (सेवानिवृत्त मुख्य अभियंता, एमईसीबी), संघटक रमेश चक्रे (सेवानिवृत्त उपायुक्त, विक्रीकर), माजी खजिनदार व सदस्य एस. बी. गायकवाड, प्रभाकर महाले (सेवानिवृत्त आयकर अधिकारी), ॲड. रमेश लभाने (पब्लिक प्रोसिक्युटर), बंडू गायकवाड (सेवानिवृत्त तहसीलदार), जे. एम. सिरसाट (सेवानिवृत्त तहसीलदार) आणि सुधाकर जाधव (सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी) आदि पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात बोलताना सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करून आपले दैनंदिन कामकाज करावे, कारण त्यातच आपली खरी प्रगती आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनपटाचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवून जोमाने अभ्यास करावा आणि आपली प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष अशोक दूधसागरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog