उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड येथे कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
नागरिकांची गैरसोय वाढली
अलिबाग, दि. २२ (स्वप्निल नाईक) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पेण-रायगड येथील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले असून संपाचा कालावधी वाढत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचारी एकत्र येऊन शासनाकडे आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करत होते. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी एकजुटीचे प्रदर्शन करत विविध घोषणांद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, परवाने नूतनीकरण तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक नागरिकांना आपली कामे प्रलंबित ठेवून परत जावे लागत असून वेळ आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. विशेषतः व्यावसायिक वाहनधारक, चालक आणि परिवहन व्यवसायाशी संबंधित नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
काही अत्यावश्यक संपर्क व मर्यादित सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी नियमित कामकाजावर परिणाम झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. संपाचा कालावधी आणखी वाढल्यास या समस्येची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या न्याय मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा संघटनेच्या पुढील निर्णयानुसार आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment