ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पेणच्या खेळाडूंचे घवघवीत यश!

'युनायटेड शोतोकान कराटे डो असोसिएशन'च्या विद्यार्थ्यांची पदकांवर मोहोर

 शालेय बॉक्सिंग मैदानात पेणचा दरारा 

​पेण-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुक्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. 'युनायटेड शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया'च्या पेण शाखेमध्ये शिहान विनायक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट तंत्र आणि कौशल्याचे प्रदर्शन करत तालुक्याच्या क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवला आहे. पिल्लई एचओसी स्कूल, रसायनी येथे ही स्पर्धा संपन्न झाली.

​या स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील (अंडर-१४) वयोगटातील ३० ते ३२ किलो वजनी गटामध्ये सार्वजनिक विद्यामंदिर पेणचा खेळाडू सुफियान मिन्हाज अन्सारी याने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत मानाचे रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) पटकावले. तसेच १९ वर्षांखालील (अंडर-१९) वयोगटातील ७५ ते ८१ किलो या वजनदार गटात 'न्यू व्हिजन कॉलेज पेण'चा खेळाडू सयान इरफान शेख याने दमदार मुक्क्यांच्या जोरावर कांस्य पदक (ब्राँझ मेडल) आपल्या नावावर केले. यासोबतच १७ वर्षांखालील (अंडर-१७) वयोगटातील ५० ते ५२ किलो वजनी गटामध्ये म. ना. नेणे कन्या विद्यालय पेणची विद्यार्थिनी सोफी सलीम शेख हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत कांस्य पदक (ब्राँझ मेडल) पटकाविले.

​अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तिन्ही खेळाडूंनी शिहान विनायक पाटील यांच्या कुशल प्रशिक्षणाच्या बळावर मिळवलेले हे यश क्रीडा क्षेत्रात कौतुकास्पद ठरत आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडूंनी बॉक्सिंगसारख्या आव्हानात्मक क्रीडा प्रकारात मारलेली ही मजल पेण परिसरातील नवोदित खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल 'युनायटेड शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर आणि उपाध्यक्ष रवींद्र र. म्हात्रे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे विशेष कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस पाठबळ दिले. यासोबतच सार्वजनिक विद्यामंदिर पेण, न्यू व्हिजन कॉलेज आणि म. ना. नेने कन्या विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक, पालक वर्ग आणि मित्र परिवाराकडून या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog