रायगड जिल्हा परिषद शाळा निडी तर्फे नागोठणे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
मान्यवरांच्या उपस्थितीत नवा शैक्षणिक प्रवास सुरू
नागोठणे-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- 'ही आवडते मज मनापासून शाळा, लावीते लळा ही जशी माऊली बाळा' या उक्तीप्रमाणे रायगड जिल्हा परिषद शाळा निडी तर्फे नागोठणे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात १५ जून २०२६ रोजी अत्यंत आनंददायी आणि उत्साही वातावरणात करण्यात आली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेतील नवगतांचे स्वागत करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये प्रत्येक दाखल पात्र मुलाच्या घरी जाऊन त्याचे प्रत्यक्ष स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर त्या सर्व मुलांना ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य प्रवेश दिंडीत सामावून घेण्यात आले. संपूर्ण गावातून वाजत-गाजत आणि प्रत्येकाच्या घरून मुलांना सन्मानाने आणत ही दिंडी काढण्यात आली, ज्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थी सुरक्षा समिती तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उत्साहाने सहभागी झाले होते.
शाळेत आलेल्या चिमुरड्यांचे स्वागत करण्यासाठी 'मुलांचे शाळेतील पहिले पाऊल' हा विशेष उपक्रम राबवण्यात आला, ज्या अंतर्गत मुलांच्या पायाचे ठसे योग्य पद्धतीने कागदावर उठवून त्यांच्या बालपणीच्या आठवणी जतन करण्यात आल्या. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मुलांच्या मनातील शाळेबद्दलची भीती दूर होऊन त्यांच्यात शाळेविषयी एक वेगळीच गोडी निर्माण झाली. या प्रसंगी कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य माननीय श्री. निखिल मढवी, ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ. प्रणाली मढवी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. तेजल मढवी यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रवेशोत्सव कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नवोदित विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. यासोबतच मुलांची शालेय पूर्वतयारी, शारीरिक क्षमता, बौद्धिक व सामाजिक विकास या आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर आधारित विविध मनोरंजक कार्यक्रम व खेळ घेण्यात आले, ज्याने मुलांचा आनंद द्विगुणित केला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शासनामार्फत प्राप्त झालेले मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, तसेच सर्व मुलांना तोंड गोड करण्यासाठी खाऊचे वाटपही करण्यात आले. या सोहळ्यासाठी पर्यवेक्षण यंत्रणेमार्फत पंचायत समिती रोहा येथील साधन व्यक्ती श्रीमती संगीता धामणसे प्रामुख्याने उपस्थित होत्या; त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे किती गरजेचे आहे यावर प्रकाश टाकत शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्गाला योग्य ते दिशादर्शन केले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. रुपेश पाटील यांनी शालेय प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला आणि गावकऱ्यांना व पालकांना शाळेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व विविध कामांचा पाठपुरावा करण्यासाठी नेहमी सहकार्य करण्याची विनंती केली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती शितल बळवंतराव यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले. आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली आणि त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियमित अध्यापनास अत्यंत उत्साहात सुरुवात करण्यात आली.




Comments
Post a Comment