पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करा!
माणगाव प्रेस क्लबचे पोलिसांना निवेदन
माणगाव-रायगड, दि. २७ (उत्तम तांबे) :- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी बोलताना अत्यंत अर्वाच्य भाषा वापरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी माणगाव प्रेस क्लबच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्यात एक निवेदन सादर करण्यात आले आहे. विविध प्रसारमाध्यमांतून समोर आलेल्या वृत्तानुसार, पत्रकारांनी खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी संतप्त होऊन "पुन्हा आलात तर मारून टाकेन," अशी थेट धमकी दिली. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी "माझ्याकडे बॉम्ब आहे," अशा प्रकारची वादग्रस्त विधाने केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
अशा प्रकारे लोकशाहीच्या चतुर्थ स्तंभाला धमकावणे, त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे आणि थेट जीवे मारण्याच्या धमक्या देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या अविचारी कृत्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर मोठा आघात होत आहे. या अन्यायाविरुद्ध माणगाव प्रेस क्लबने आक्रमक भूमिका घेत आवाज उठविला आहे. या निवेदनाद्वारे खासदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांनी केलेल्या कथित धमकीच्या वक्तव्याची सखोल चौकशी व्हावी आणि पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
माणगाव तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकने यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. हे निवेदन सादर करताना माणगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, रायगड प्रेस क्लबचे संघटक पद्माकर उभारे, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, तसेच प्रमुख सल्लागार उत्तम तांबे आणि विनोद साबळे आदी पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment