शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!
मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न
महाड-रायगड, दि. २२ (प्रतिनिधी) :- महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा व उपस्थितीचा आढावा घेण्याच्या हेतूने 'विद्यार्थी उपस्थिती पट आढावा' हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील करंजाडी पंचायत समिती गणातील पहिली महत्त्वपूर्ण आढावा सभा रायगड जिल्हा परिषद शाळा, मुठवली येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या व्यासपीठावर महाड पंचायत समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ शैक्षणिक अभ्यासक श्री. संदीपभाऊ रमेश खिडबिडे, गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे, नागाव बीटचे विस्ताराधिकारी श्री. तांबे, केंद्रप्रमुख वसंत साळुंखे आणि संदीप कदम यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान करंजाडी गणातील उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन व उद्बोधन करताना महाड पंचायत समितीचे सदस्य श्री. संदीपभाऊ खिडबिडे यांनी सांगितले की, शिक्षकच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करू शकतात. करंजाडी गणातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे आजवरचे कार्य खरोखरच आदर्शवत असून, त्यामध्ये आगामी काळातही सातत्य असणे गरजेचे आहे. शिक्षकांना अध्यापन करताना किंवा प्रशासकीय पातळीवर काही अडीअडचणी येत असतील, तर त्या शंभर टक्के सोडवण्याचा आमचा ठाम मानस आहे. याशिवाय शालेय पायाभूत सुविधा किंवा इतर बाबतीत काही समस्या असतील, तर त्यादेखील प्राधान्याने सोडवून घेतल्या जातील आणि भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणावर आपल्या सर्वांचा विशेष भर असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षण क्षेत्रातील गतिमान आणि नवनवीन बदलांची माहिती शिक्षकांना वेळेवर व्हावी यासाठी आगामी काळात विशेष तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या नाविन्यपूर्ण ॲपचा वर्गामध्ये कसा प्रभावी वापर करता येईल, यावर विशेष भर दिला जाईल असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
या अभ्यासपूर्ण शैक्षणिक आढावा बैठकीत उपस्थित मुख्याध्यापकांनी देखील विविध शैक्षणिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आणि आपल्या शाळांमधील उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा चोचिंदे येथील सौ. जंगम, रावढळ शाळेच्या सौ. स्मिता उपाध्याय, वाणीकोंड करंजाडी शाळेचे श्री. सलगर, सुतारकोंड शाळेच्या ज्योती सूर्यवंशी, नाडगाव तर्फे तुडील शाळेचे हरी अहिरे आणि आंबिवली खुर्द शाळेचे अनिल मदने यांच्यासह करंजाडी गणातील सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी या महत्त्वपूर्ण चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या उपक्रमामागची सविस्तर भूमिका व उद्देश स्पष्ट केला, तर कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रप्रमुख वसंत साळुंखे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी आणि मुख्याध्यापकांचे आभार मानले. संपूर्ण करंजाडी पंचायत समिती गणातील मुख्याध्यापकांच्या शंभर टक्के उपस्थितीमुळे ही आढावा बैठक अत्यंत यशस्वी ठरली.


Comments
Post a Comment