ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

खारेगाव डिझेल तस्करी : संशयितांकडून 'केस मॅनेज' करण्यासाठी पडद्यामागून फिल्डिंग?
अटकपूर्व जामिनासाठी हालचाली; कळवा पोलिसांच्या भूमिकेकडे ठाणेकरांचे लक्ष


ठाणे (प्रतिनिधी) :-  मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने २५,००० लिटर बेकायदेशीर डिझेल जप्त केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झालेल्या या मोठ्या रॅकेटमधील मुख्य संशयितांना वाचवण्यासाठी आणि पोलिसांवर दबाव आणून 'केस मॅनेज' करण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक चर्चा आता पोलीस वर्तुळात आणि ठाण्यात रंगू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि त्यांचे पाठीराखे अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail - AB) मिळवण्यासाठी जोरदार कायदेशीर मोर्चेबांधणी करत आहेत. सामान्यतः अशा गंभीर आणि आंतरराज्यीय रॅकेटच्या गुन्ह्यांमध्ये कस्टोडिअल इंटरोगेशन म्हणजेच ताब्यात घेऊन चौकशी करणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या वेगवेगळ्या चर्चांमुळे, पोलीस न्यायालयात आरोपींच्या जामीन अर्जाला कडक विरोध करणार की मवाळ भूमिका घेऊन आरोपींचा मार्ग मोकळा करणार, याकडे आता संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
​या मुख्य तस्करी प्रकरणाचा सखोल तपास केला असता, यात नाव असलेला आरोपी राजू पंडित हा डिझेल आणि इंधन तस्करीच्या विश्वातील सराईत मोहरा असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील दादर सागरी पोलीस ठाणे (गु.र.नं. ८९/२०२३), रेवदंडा पोलीस ठाणे (गु.र.नं. १७४/२०२३), खोपोली पोलीस ठाणे (गु.र.नं. १७४/२०२३ - वर्ग केलेला गुन्हा) आणि पेण पोलीस ठाणे (गु.र.नं. ०००२/२०२५) येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईतही त्याच्यावर मुंबई गुन्हे शाखेत (DCB) दोन गुन्हे (गु.र.नं. ६५/२०१५ आणि गु.र.नं. ६५/२०१६) तसेच येलो गेट पोलीस ठाण्यात तीन गुन्हे (गु.र.नं. २/२०१८, गु.र.नं. २०/२०१९ आणि गु.र.नं. २२४/२०२३) अशी मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाठीशी आहे. एवढा मोठा गुन्हेगारी आलेख असतानाही राजू पंडित आणि त्याचे साथीदार पुन्हा एकदा राजरोसपणे एवढे मोठे रॅकेट चालवत होते, यावरून या डिझेल माफियांचे धाडस किती वाढले आहे, हे स्पष्ट होते.
​प्राथमिक तपासानुसार, हे डिझेल विरार खाडीच्या किनारी बोटींमधून आणून टँकरमध्ये भरण्यात आले होते आणि ते नाशिकच्या दिशेने घेऊन जाण्याचा आरोपींचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्याचे कोणतेही वैध मापदंड न पाळता, सामान्य टँकरवर 'ईडीबल ऑईल' (खाद्यतेल) असे लिहून लोकांची दिशाभूल करत ही धोकादायक वाहतूक सुरू होती. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल याला अटक करण्यात आली असली, तरी टँकर मालक रितेश सिंग यांच्यासह पालघर व सुरत येथील रोशन शिरोडकर, नितीन कोली, राजू पंडित, दीपक पवार, सागर पाटील आणि अनिल सुरत अशा एकूण ८ जणांवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे केवळ एका टँकरपुरते मर्यादित नसून, यामागे मोठे आंतरराज्यीय डिझेल माफिया सक्रिय असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यातच राजू पंडित सारख्या सराईत गुन्हेगारांचा यात थेट सहभाग असल्याने, जर मुख्य आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला, तर या गंभीर प्रकरणाचा तपास कायमचा थंड बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
​या धडक कारवाईनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी तस्करी करणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे जाहीर निर्देश दिले होते. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ (Essential Commodities Act), मोटार स्पीरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर - २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ ची कडक कलमे लागलेली असतानाही, जर स्थानिक पोलीस यंत्रणेकडून तपासात ढिलाई झाली किंवा कोर्टात कमकुवत अहवाल सादर केला गेला, तर तो थेट जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार ठरेल. कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रावजी उतेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल आणि सराईत गुन्हेगारांचे जाळे असणाऱ्या या डिझेल तस्करीच्या गुन्ह्यात पोलीस 'खाकी'ची इभ्रत राखणार की संशयाच्या भोवऱ्यात अडकणार, हे येत्या काही दिवसांत कोर्टातील सुनावणी दरम्यान स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर आणि कोर्टातील घडामोडींवर माध्यम म्हणून आमचे बारीक लक्ष राहील.

Comments

Popular posts from this blog