ब्रेकिंग न्यूज
🚨 वीटभट्टीतून थेट लंडनच्या विद्यापीठापर्यंत!!! आदिवासी समाजातील सपना वाघमारेच्या जिद्दीची सातासमुद्रापार ऐतिहासिक झेप... रायगडची पहिली आदिवासी महिला वकील आता लंडनमध्ये घेणार कायद्याचे उच्च शिक्षण... 🚨

आदिवासी समाजातील सपना वाघमारेच्या जिद्दीची सातासमुद्रापार ऐतिहासिक झेप!
रायगडची पहिली आदिवासी महिला वकील आता लंडनमध्ये घेणार कायद्याचे उच्च शिक्षण
 विटभट्टीतून थेट लंडनपर्यंत! 

रोहा-रायगड, दि. ३० मे (संदीप सरफळे) :- ​रोहा तालुक्यातील कोलाडजवळील चिंचवली येथील आदिवासी कातकरी समाजातील कु. सपना राजेश वाघमारे हिने आपल्या अथांग संघर्ष, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर थेट लंडनच्या उच्च शिक्षणाच्या दारात प्रवेश मिळवत एक नवा इतिहास घडवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील पहिली महिला वकील ठरण्याचा अभूतपूर्व मान पटकावल्यानंतर, आता तिने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली असून लंडनमधील नामांकित विद्यापीठांमध्ये तिची 'एलएलएम' (LLM) या कायद्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी कातकरी समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणावह ठरले आहे.

​सपनाचा हा थक्क करणारा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर आणि संघर्षाने भरलेला राहिलेला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या चिंचवली येथील प्राथमिक शाळेतून तिच्या शिक्षणाचा पाया रचला गेला. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी तिने माणगाव तालुक्यातील उतेखोल येथील वनवासी कल्याण आश्रम शाळेत प्रवेश घेतला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुण्याच्या प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण अत्यंत जिद्दीने पूर्ण केले. तिचे कुटुंब अत्यंत गरीब असून आई-वडील विटभट्टी, ऊसतोड आणि मोलमजुरी करून कसाबसा आपला संसार चालवतात. अशा या अशिक्षित कुटुंबात जन्माला आलेल्या आणि घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नसलेल्या सपनाने आर्थिक संकटांच्या मोठ्या डोंगरावर मात करत हे दैदीप्यमान यश संपादन केले आहे.

​तिच्या या गुणवत्तेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 'ग्लोबल स्कॉलरशिप' कार्यक्रमांतर्गत आता सपनाची लंडनमधील जगप्रसिद्ध 'युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स' (University of Leeds) आणि 'क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन' (Queen Mary University of London) या दोन्ही नामांकित संस्थांमध्ये निवड झाली आहे. येत्या सप्टेंबर २०२६ मध्ये ती 'एलएलएम इन क्रिमिनल जस्टीस अँड क्रिमिनल लॉ' (LLM in Criminal Justice and Criminal Law) या विशेष अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना होणार आहे. एका दुर्गम पाड्यावरील मुलीने थेट जागतिक पातळीवरील विद्यापीठात प्रवेश मिळवल्यामुळे तिच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​आपल्या या यशस्वी प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सपना सांगते की, हा कठीण प्रवास तिच्या एकटीचा नव्हता. तिचे मामा भिवा पवार, मामी ज्योत्स्ना पवार, तिचे शिक्षक, शासकीय वस्तीगृह प्रशासन आणि विविध मार्गदर्शकांच्या भक्कम पाठबळामुळेच तिला इथपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. अत्यंत भावूक होऊन तिने कोरोनाकाळातील आपले अनुभवही सांगितले. त्या अत्यंत भीषण काळात पैशांची प्रचंड चणचण असताना, केवळ एक वडापाव खाऊन संपूर्ण दिवस काढले, मात्र कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाची साथ सोडू दिली नाही, असे तिने नमूद केले. परदेशातून कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परत आल्यानंतर आपल्या स्वतःच्या वंचित आणि शोषित समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठीच आयुष्यभर काम करण्याचा ठाम निर्धार तिने व्यक्त केला आहे. सपनाच्या या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी यशामुळे संपूर्ण कातकरी समाजात एका नव्या आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, दुर्गम व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी ती यशाचा एक प्रकाशमान दीप ठरली आहे.

Comments