ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

पेण तालुक्यातील कोलेटी येथे JSW कंपनीच्या CSR निधीतून झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप!
निकृष्ट बांधकामाप्रकरणी ॲड. काशिनाथ ठाकूर आक्रमक
 सखोल चौकशीची मागणी 

पेण-रायगड, दि. २७ (प्रतिनिधी) :- पेण तालुक्यातील कोलेटी ग्रामपंचायत अंतर्गत जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीच्या सीएसआर (CSR) निधीतून करण्यात आलेले लाखो रुपयांचे विकासकाम पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. सुमारे ३० लाख रुपये खर्च करून मे २०२६ मध्ये पूर्ण करण्यात आलेले बांधकाम पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर ढासळल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पहिल्याच पावसाने या कामाची पोलखोल केली असून, सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आता प्रत्यक्ष पुराव्यांसह केला जात आहे.

व्हिडीयो

​ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विकासकामामध्ये प्रचंड प्रमाणात अनागोंदी कारभार झाला असून सिमेंटसह इतर आवश्यक बांधकाम साहित्याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात आला. निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळेच बांधकामाची गुणवत्ता खालावली आणि परिणामी पहिल्याच पावसाचा जोर सहन न झाल्याने या बांधकामाचा मोठा भाग कोसळल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे काम सुरू असतानाच मार्च, एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत ॲड. ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागाकडे हे काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे होत असल्याची लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाकडून आणि कंपनीच्या व्यवस्थापनाकडून या गंभीर तक्रारीची साधी दखलही घेण्यात आली नाही, अथवा कोणत्याही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन कामाची पाहणी करण्याची तसदी घेतली नाही, असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.

​या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाचा आणि संबंधित यंत्रणांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून यात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवली जात आहे. कोलेटी येथील या कामामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित लोकप्रतिनिधी, वॉटर शेड ऑर्गनायझेशन तसेच जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे साटेलोटे असून त्यांचा या भ्रष्टाचारात थेट सहभाग असल्याचा संशय ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या सर्व घटकांची वरिष्ठ पातळीवरून सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच, कोलेटी येथील हलगर्जीपणा पाहता, पेण तालुक्यामध्ये जेएसडब्ल्यूच्या सीएसआर निधीतून आजवर करण्यात आलेल्या इतर सर्वच विकासकामांची देखील एका स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून शासकीय व खाजगी निधीचा अपहार करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog