शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिकेची भेट
रुग्णसेवेसाठी अधिक सक्षम यंत्रणा – मंत्री भरतशेठ गोगावले
लोणेरे-रायगड, दि. २० (राम भोस्तेकर) :- शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून युवा सेना माणगाव तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सौजन्याने ही रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयाला प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना नामदार भरत गोगावले म्हणाले की, “शिवसेना पक्षाच्या स्थापनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. जनसेवेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आज जनतेच्या सेवेसाठी वटवृक्षासारखी उभी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जनतेचे सेवेकरी म्हणून कार्यरत आहोत. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून माणगाव तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ गरजू रुग्णांना निश्चितच होईल.”
यावेळी मंत्री गोगावले यांनी उपजिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध विभागांचा आढावा घेतला. अतिदक्षता विभाग, औषधांचा साठा, वैद्यकीय सेवा तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत त्यांनी रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या कार्यक्रमास युवा सेना कोर कमिटी सदस्य तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, ज्ञानदेव उतेकर, विपुल उभारे, युवा सेना माणगाव तालुक्याचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय कर्मचारी, शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.माणगाव तालुक्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Comments
Post a Comment