पेण तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक वसंत माळू मळेकर यांचे दुःखद निधन
सुख-दुःखात धावून जाणारे हसतमुख व्यक्तिमत्त्व हरपले!
तरुणांचा मार्गदर्शक हरपल्याची भावना
बेणसे-रायगड, दि. २५ जून (चंद्रकांत अडसुळे) :- पेण तालुक्यातील बेणसेवाडी गावातील सामाजिक क्षेत्रातील धडाडीचे समाजसेवक वसंत माळू मळेकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने केवळ बेणसेवाडी गावावरच नव्हे, तर संपूर्ण शिहू पंचक्रोशीत एक मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र तीव्र शोककळा पसरली आहे. अत्यंत हसतमुख स्वभावाचे असलेले वसंत मळेकर हे बेणसेवाडी गावातील तरुण पिढीचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक होते. गावातील नाच मंडळ, क्रिकेट आणि कबड्डी यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना ते नेहमीच मोलाचे प्रोत्साहन देत असत. बेणसेवाडी गावातील कोणत्याही कुटुंबाच्या सुख-दुःखात नेहमीच हिरीरीने आणि आस्थेने धावून जाणारे वसंत मळेकर हे गावातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही नेहमी अग्रस्थानी असायचे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली असून समाजकार्यात नेहमी सक्रिय राहणाऱ्या एका चांगल्या माणसाला आपण मुकल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनानंतर वसंत मळेकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात बेणसेवाडी येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी मळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. वसंत मळेकर यांच्या पश्चात पत्नी वनिता वसंत मळेकर, वाडगाव (अलिबाग) येथील विवाहीत मुलगी सौ. नुतन मंगेश भाईजे, विवाहीत मुलगा विश्वनाथ वसंत मळेकर, सून सौ. दर्शना विश्वनाथ मळेकर, नातवंडे, तसेच तीन विवाहित बहिणी आणि एक भाऊ असा मोठा आणि सुशिक्षित परिवार आहे. मळेकर कुटुंबाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दिवंगत वसंत मळेकर यांचा दशक्रिया विधी बुधवार, दिनांक १ जुलै २०२६ रोजी बेणसेवाडी येथे संपन्न होणार आहे, तर उत्तरकार्याचा विधी शनिवार, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी त्यांच्या बेणसेवाडी येथील राहत्या घरी पार पडणार आहे.

Comments
Post a Comment