ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान! अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू... मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान, पंचनामे सुरू 🚨

वडवली आगरी युवा संघटनेचा स्तुत्य उपक्रम!
दानशूर राजेंद्र चाळके यांनी घेतले गावातील ६ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

वडवली-श्रीवर्धन, दि. २० (रूपेश नाक्ती) :- "ज्ञानम् परम ध्येयम" म्हणजेच ज्ञान हेच सर्वोच्च ध्येय आहे, हा उदात्त विचार डोळ्यांसमोर ठेवून वडवली आगरी युवा संघटना, मुंबई यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक कौतुकास्पद आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला आहे. आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संघटनेने यावर्षी देखील गावातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. या विशेष उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च या संघटनेमार्फत उचलला जातो, जेणेकरून पैशांअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहणार नाही.
या उपक्रमाला अधिक बळ देत यंदाच्या वर्षी आपल्या गावातील प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. राजेंद्र चाळके यांनी पुढे येत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी समाजहिताचे उत्तम उदाहरण घालून देत या सर्व विद्यार्थ्यांच्या चालू वर्षाच्या शैक्षणिक पालकत्वाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे आणि सामाजिक भावनेमुळे संघटनेच्या कार्याला मोठी मदत झाली असून, वडवली आगरी युवा संघटनेच्या वतीने श्री. राजेंद्र चाळके यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गावातील शैक्षणिक चळवळीला नक्कीच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या शैक्षणिक वर्षात संघटनेच्या माध्यमातून आणि श्री. राजेंद्र चाळके यांच्या सहकार्याने गावातील एकूण सहा विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी विघ्नेश दीपक भायदे, इयत्ता नववीतील विद्यार्थिनी आर्या नितेश पेरवे, इयत्ता आठवीतील विद्यार्थी अथर्व बंड्या पाटील, इयत्ता सातवीतील प्रांजळ नितीन पेरवे व निष्ठा दिनेश पेरवे, तसेच इयत्ता सहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी जय सुनील नाक्ती या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक वाटचालीची जबाबदारी आता यशस्वीपणे स्वीकारण्यात आली आहे.
​या कौतुकास्पद उपक्रमाच्या निमित्ताने वडवली आगरी युवा संघटना, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक दत्तक घेतलेल्या या सर्व गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, तसेच ग्रामीण भागातील अशा उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog