रिलायन्स नागोठणे युनिटच्या ‘भारतीय श्रमिक शक्ती संघा’ची नवीन कार्यकारिणी जाहीर
अध्यक्ष पदावर किशोर शिर्के, तर सरचिटणीस पदावर चंद्रकांत अडसुळे यांची नियुक्ती
बेणसे-रायगड, दि. ३१ (प्रतिनिधी) :- अलिबाग येथील राजमाला भागातील आमदार महेंद्र दळवी यांच्या संपर्क कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमधील ‘भारतीय श्रमिक शक्ती संघ’ या कामगार संघटनेची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे घोषित करण्यात आली. ही नवीन कार्यकारिणी १ जून २०२६ पासून आपल्या कामाची धुरा सांभाळणार आहे. या नवीन समितीच्या अध्यक्षपदी किशोर शिर्के यांची, तर सरचिटणीसपदी चंद्रकांत अडसुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण घोषणा सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार महेंद्र दळवी यांनी रिलायन्स मधील कामगारांच्या हक्कांवर आणि स्थानिक रोजगारावर विशेष भाष्य केले. रिलायन्स कंपनीमध्ये दीपक रानवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कामगार संघटनेला आपला पूर्ण आणि खंबीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे जाहीर केले. कंपनीच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना आणि युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, हीच आपली सुरुवातीपासूनची आणि ठाम भूमिका राहिली असल्याचे सांगत त्यांनी कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या या नवीन कार्यकारिणीची घोषणा केंद्रीय अध्यक्ष ॲड. नितीन शिवकर, केंद्रीय कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे आणि केंद्रीय सरचिटणीस जिम्मी डे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. संघटनेच्या जाहीर झालेल्या या विस्तृत कार्यकारिणीमध्ये अनेक अनुभवी व सक्रिय सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यानुसार नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून पंडित तुपकर यांची, तर वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मनोज पेढावी आणि दिनेश शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अजित घरत, विनोद गोरे आणि राजकुमार राजभर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघटनेचे कामकाज सुचारू रूपाने चालवण्यासाठी सरचिटणीस चंद्रकांत अडसुळे यांच्यासोबत सचिव म्हणून यशवंत डाकी व प्रकाश तेरडे तर सहसचिव म्हणून संजय शिर्के, विठोबा कुथे, नरेश म्हात्रे आणि इस्माईल पीत्तू यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी खजिनदार म्हणून असलम चोगले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
संघटनेला अंतर्गत स्तरावर बळकटी देण्यासाठी आणि कामगारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांची मोठी फळी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनिल जांबेकर, दीपक पाटील, राजेश जवके, सिताराम वारगे, सुभाष म्हात्रे आणि गणेश जाधव यांचा कार्यकारिणी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. संघटनेला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभवे यासाठी सल्लागार म्हणून सुभाष खराडे व मारुती दांडेकर यांची, तर कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. महेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये शिवसेना रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख संजीवनी नाईक, नगरसेविका सुजाता डाकी, नगरसेवक भूषण कडू, अशोक भोय, प्रकाश मोरे, भारती सिंगासने, मोहन भोय, अजिम बेणसेकर, सुभाष ताडकर, अजय घरत, संजय काकडे, प्रमोद मोरे, मुजिफ मोमिन, सुधीर पारंगे, श्री. विरकुड आणि श्री. शेवतकर प्रामुख्याने उपस्थित होते. या मान्यवरांसह रिलायन्स नागोठणे युनिटमधील कर्मचारी आणि कामगार अत्यंत मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते, ज्यामुळे नवनियुक्त कार्यकारिणीचा उत्साह द्विगुणित झाला होता.


Comments
Post a Comment