NEET पेपर लीक घोटाळ्याविरोधात उत्तर मुंबई युवक काँग्रेसचे बोरिवलीत तीव्र आंदोलन!
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
बोरावली-मुंबई (प्रतिनिधी) :- देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षेच्या पेपर लीक घोटाळ्याचे पडसाद आता संपूर्ण देशासह मुंबईतही तीव्रतेने उमटू लागले आहेत. या घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी उत्तर मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर नुकतेच एक भव्य निषेध आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले. या आंदोलनादरम्यान बोरिवली रेल्वे स्थानक परिसर केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दणाणून गेला होता.
या आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह संभाजी ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दिला. संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष (महिला आघाडी) पूनम शिंदे, तसेच महिला पदाधिकारी गटप्रमुख सुरेखा अल्लमवर आणि शरीफा शेख यांनी याप्रसंगी उपस्थित राहून केंद्र सरकारच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत, देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या अकार्यक्षम आणि बेजबाबदार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी लावून धरली.
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या युवक काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर अत्यंत कडाडून टीका केली. भाजपच्या ढिसाळ कारभारामुळे आणि त्यांच्या "लीक तंत्रामुळे" देशातील २२ लाखांहून अधिक प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून, त्यांच्या पालकांच्या घामाच्या पैशांना आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याला मोठ्या धोक्यात टाकले गेले असल्याचा आरोप यावेळी नेत्यांनी केला. तसेच, जोपर्यंत या परीक्षा घोटाळ्यातील पीडित विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या मुख्य सुत्रधारांवर व अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत युवक काँग्रेसचा हा लढा थांबणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या व्यापक निषेध आंदोलनाप्रसंगी मुंबई युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अमनदीप सिंग, उत्तर मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजय मिश्रा, बोरिवली युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय नागराळे, चारकोप युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष सरोज आणि ओबीसी जिल्हा काँग्रेसचे प्रशांत परदेशी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रमुख नेत्यांसह काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण वर्ग आणि बोरिवली परिसरातील सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या जनजागृती अभियानात सहभागी झाले होते.

Comments
Post a Comment