ब्रेकिंग न्यूज
🚨 वीटभट्टीतून थेट लंडनच्या विद्यापीठापर्यंत!!! आदिवासी समाजातील सपना वाघमारेच्या जिद्दीची सातासमुद्रापार ऐतिहासिक झेप... रायगडची पहिली आदिवासी महिला वकील आता लंडनमध्ये घेणार कायद्याचे उच्च शिक्षण... 🚨

​न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या आराध्य गिरिगोसावीची राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड!
कोल्हापूर बटालियनमधून एकमेव मानकरी

रोहा-​रायगड, दि. ३० मे (किरण मोरे) :- श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), कोल्हापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात शिकणारा एनसीसी कॅडेट कु. आराध्य अजित गिरिगोसावी याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर यश संपादन केले असून, त्याची राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण शिबिरासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) द्वारे आयोजित केली जाणारी 'ऑल इंडिया जी. व्ही. मावलणकर शूटिंग चॅम्पियनशिप' ही देशातील सर्वात मोठी आणि अत्यंत प्रतिष्ठित अशी 'प्रि-नॅशनल' नेमबाजी स्पर्धा मानली जाते. या नामांकित चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवडल्या गेलेल्या एकूण ४० कॅडेट्समध्ये आराध्य गिरिगोसावी याने मानाचे स्थान मिळवले असून, ही कामगिरी एनआयटी महाविद्यालय आणि संपूर्ण कोल्हापूर परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.

​आराध्यने या यश प्राप्तीसाठी घेतलेले कष्ट आणि त्याचे सातत्य अत्यंत कौतुकास्पद आहे. तिसऱ्या एनसीसी शिबिरानंतर प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, फर्स्ट रिलिफमधून फर्स्ट पोझिशन मिळवत त्याने हे यश खेचून आणले. विशेष म्हणजे, संपूर्ण कोल्हापूर बटालियनमधून अशा प्रकारे निवडला गेलेला आराध्य हा एकमेव कॅडेट ठरला आहे. या दमदार कामगिरीनंतर आता त्याची पुढील टप्प्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा 'कॅट १' (Cat 1) कॅम्पसाठी निवड झाली आहे. आगामी काळात कॅट १, कॅट २ आणि कॅट ३ ही खडतर आणि तांत्रिक शिबिरे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, आराध्यला या अत्यंत प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे सर्वोत्तम १० कॅडेट्ससोबत प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. त्याच्या या कौशल्याला आकार देण्यासाठी आणि रायफल शूटिंगचे उत्तम तंत्र शिकवण्यासाठी एनसीसी भवनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला विशेष आणि मोलाचे प्रशिक्षण दिले आहे.

​आराध्य गिरिगोसावी याच्या या देदीप्यमान यशामागे त्याला मिळालेले उत्तम मार्गदर्शन आणि कौटुंबिक पाठबळ अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या संपूर्ण प्रवासात त्याला न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक मा. डॉ. संजय एच. दाभोळे सर, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. डी. पी. जगताप, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. बी. बी. राजिगरे, तसेच एनसीसी केअरटेकर अधिकारी (CTO) मॅडम सौ. एम. आर. (माधुरी) पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले. यासोबतच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्याच्या पालकांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आराध्य हे यश संपादन करू शकला. आराध्यच्या या ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे संचालक, सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याचे मनापासून कौतुक केले असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतील निवडीसाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog