नागोठणे रिलायन्सच्या सेवानिवृत्त कामगारांचा निरोप समारंभ संपन्न
भारतीय श्रमिक शक्तीसंघ कामगारांच्या पाठीशी ठाम - दिपकभाई रानवडे
बेणसे-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियन ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठण्याच्या कामगारांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभी आहे. कोणत्याही कामगारावर अन्याय झाल्यास संघटना त्याला न्याय मिळवून देईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते, कामगार नेते तथा भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियनचे केंद्रीय कार्याध्यक्ष दिपकभाई रानवडे यांनी केले. नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजमधून सेवानिवृत्त होणाऱ्या कामगार व पदाधिकाऱ्यांच्या निरोप समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, कामगारांनी कंपनीचे नियम व 'स्टँडिंग ऑर्डर्स' आत्मसात करून आपले काम इमानेइतबारे करावे आणि स्वतःची सुरक्षितता अबाधित ठेवावी, असे आवाहनही शेवटी केले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून आगामी ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असलेले भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियनचे अध्यक्ष श्री. संजयभाई काकडे, सचिव श्री. सुधीरभाई पारंगे, वरिष्ठ पदाधिकारी श्री. अजिमभाई बेणसेकर तसेच भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री. सुभाषभाई ताडकर आणि वरिष्ठ पदाधिकारी श्री. महादूभाई लाडगे यांचा संयुक्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारतीय श्रमिक शक्तीसंघ युनियन, भारतीय कामगार सेना व महाराष्ट्र समर्थ कामगार सेना (रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे युनिट) यांच्या वतीने २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रिलायन्स टाऊनशिप येथील इस्टेट ऑफिस येथे हा सोहळा पार पडला. याप्रसंगी सल्लागार श्री. सुभाष खराडे, भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी श्री. अशोकभाई भोय आणि महाराष्ट्र समर्थ सेनेचे श्री. सुहासभाई कुथे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रकांत अडसुळे यांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडला, ज्याला के. टी. शिर्के यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर चंद्रकांत अडसुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या सोहळ्यात प्रकाश मोरे, के. टी. शिर्के, अशोक भोय, दिनेश शिर्के, संजय शिर्के, सुभाष खराडे, प्रमोद मोरे, संजय काकडे, अजिम बेणसेकर, सुभाष ताडकर, महादू लाडगे आणि सुधीर पारंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कामगार नेत्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन कामगार नेते दिपकभाई रानवडे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला सुरेश गायकर, मोहन भोय, विनोद गोरे, राजेश जवके, अरविंद मेहता, अरविंद घोरपडे, पंडित तुपकर, मनोज पेढवी, गणपत खाडे, रवींद्र अडसुळे, कमलाकर डिकळे, इस्माईल पित्तू यांच्यासह अनेक मान्यवर आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमोद मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Comments
Post a Comment