दादांच्या पश्चात रायगडकडे विशेष लक्ष; सुनेत्रावहिनींची ग्वाही!
रोह्यात विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा; सभागृह भारावले
रोहा-रायगड, दि. १२ (संदीप सरफळे) :- “कोकण ही स्वर्गीय अजितदादांची अत्यंत आवडती भूमी होती. येथील कष्टाळू माणसांवर त्यांचे विशेष प्रेम होते. मंत्रीमंडळात काम करताना त्यांनी कोकणाला भरभरून दिले. आज दादा आपल्यात नसले तरी त्यांच्या पश्चात रोह्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिले जाईल,” अशी ठाम ग्वाही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा ना. सुनेत्रावहिनी पवार यांनी दिली. त्यांच्या या शब्दांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या वतीने कुंडलिका नदी संवर्धन, “खाऊ गल्ली”, “शिवसृष्टी” शिल्प उभारणी, मंदिर भक्तनिवास नूतनीकरण आली आयोजित केलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, म्हसळा सभापती बबन मनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
लाडके तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच कोकण दौऱ्यावर आलेल्या सुनेत्रावहिनी पवार यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांची मने जिंकली. “रायगड ही स्वराज्याला राजा देणारी ऐतिहासिक भूमी आहे. याच भूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह केला,” असे सांगत त्यांनी इतिहासाची आठवण जागवली.
यावेळी त्यांनी विकासकामांबाबतही आश्वस्त करताना, “आज ज्या कामांचे भूमिपूजन आपल्या हस्ते झाले, ती कामे पूर्ण झाल्यानंतर लोकार्पणासाठी मी पुन्हा नक्की येणार,” असे जाहीर केले. तसेच “आदिती माझ्या मुलीसारखी आहे,” असे त्या म्हणताच उपस्थित जनतेने टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
दादांच्या आठवणींनी सभागृह भारावले
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी १२ सप्टेंबर २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेल्या डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याची ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. दादांच्या दमदार भाषणासह त्यांच्या प्रयत्नांतून रोहा शहरासाठी मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या विकासकामांची माहिती दाखविण्यात आली. ध्वनीचित्रफीत सुरू होताच सभागृहातील अनेक कार्यकर्ते भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Comments
Post a Comment