बेणसे, झोतिरपाडा, शिहू परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण!
महावितरणच्या कारभाराविरोधात संतापाची लाट
बेणसे-रायगड, दि. २७ (चंद्रकांत अडसुळे) :- बेणसे, झोतिरपाडा आणि शिहू विभागातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात सध्या जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी अचानक वीज गायब होत असल्यामुळे संपूर्ण परिसर वारंवार अंधाराच्या विळख्यात सापडत आहे. या लहरी वीजपुरवठ्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, रुग्ण, गरोदर महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. बेणसे, झोतिरपाडा आणि शिहू परिसरातील ही वीज समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे.
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज गायब होताच डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. असह्य उकाडा, सर्वत्र पसरलेला अंधार आणि डासांचा उपद्रव यामुळे नागरिकांची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली आहे. कडाक्याच्या उकाड्यामुळे लहान मुले रात्रभर रडत असतात, तर वृद्ध व आजारी नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ग्रामीण भागात साप, विंचू आणि इतर विषारी कीटकांची मोठी भीती असते, त्यामुळे रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी कमालीचे धोकादायक बनले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा का वीज खंडित झाली की संबंधित वीज कर्मचारी आणि अधिकारी यांचे मोबाईल फोन 'नॉट रिचेबल' होतात. त्यामुळे नागरिकांना आपली तक्रारही नोंदवता येत नाही आणि व्यवस्थापनाकडून या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. एकीकडे वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, तर दुसरीकडे मात्र ग्राहकांना दरमहा भरमसाठ वीजबिले पाठवली जात आहेत. या अवाजवी बिलांमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले नागरिक आता पुरते मेटाकुटीस आले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने आता जनतेचा संयम सुटू लागला असून, ही समस्या तातडीने न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Comments
Post a Comment