महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव
रोहा-रायगड, दि. १९ (संदीप सरफळे) :- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी शासनमान्यता प्राप्त ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती’ रायगड जिल्हा शाखेच्या वतीने गुरुवारी, १६ एप्रिल २०२६ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. रायगड जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षपदी निवड झालेले श्री. मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष श्री. मधुकर पाटील आणि शिक्षण सभापती श्री. चंद्रकांत कळंबे यांचा शिक्षक समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त नेतृत्वाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षक संघटना यांनी परस्पर समन्वयाने काम केल्यास जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित अध्यक्षांनी देखील शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते श्री. मारुती कळंबे, राज्य कार्यालयीन चिटणीस श्री. किशोर पाटील आणि राज्य प्रतिनिधी श्री. अनिल नागोठकर यांनी संघटनेच्या वतीने संवाद साधला. तसेच कोकण विभागीय उपाध्यक्ष श्री. शायालिक जामघरे, कोकण विभाग महिला आघाडी प्रमुख श्रीमती विद्या रोहेकर आणि जिल्हाध्यक्ष श्री. विजय येलवे यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडले. या महत्त्वपूर्ण सदिच्छा भेटीला जिल्हा सरचिटणीस श्री. तानाजी गवारी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. यशवंत मोंढे यांच्यासह विविध तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तळा तालुकाध्यक्ष श्री. सुनील बैकर, रोहा तालुकाध्यक्ष श्री. ब्रिजेश भादेकर, रोहा उपाध्यक्ष श्री. संतोष खलापकर आणि रोहा प्रसिद्धीप्रमुख श्री. संतोष वेटकोळी यांनी स्थानिक स्तरावरील शैक्षणिक विषयांवर चर्चा केली. संपूर्ण कार्यक्रमात दोन्ही बाजूंनी सहकार्याची भूमिका मांडण्यात आली असून, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रशासन आणि संघटना खांद्याला खांदा लावून काम करतील, असा सूर या सदिच्छा भेटीतून उमटला आहे. या सकारात्मक संवादामुळे शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण असून आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राला नवे वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments
Post a Comment