ब्रेकिंग न्यूज
🚨 राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड.!🚨

मुंबईत रंगणार '१३ व्या एस.के.वाय.ए. रॉयल कप' अखिल भारतीय कराटे स्पर्धेचा थरार!
देशभरातील खेळाडूंची लागणार मांदियाळी

​मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) :-  शोतोकान कराटे युथ असोसिएशन इंडियाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील मानाची समजली जाणारी “13th SKYA Royal Cup – All India Karate Championship 2026” ही स्पर्धा यंदा मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी गोरेगाव (पश्चिम) येथील स्टेशन रोडवरील आय. बी. पटेल म्युनिसिपल स्कूलच्या प्रांगणात हा भव्य क्रीडा सोहळा पार पडणार आहे. सकाळी ८:०० वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत विविध गटांतील सामने रंगणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईत देशभरातील मार्शल आर्ट्स प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

​या भव्य स्पर्धेचे नेटके नियोजन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजू मोरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. स्पर्धेच्या तांत्रिक बाबींची धुरा तांत्रिक संचालक श्री. वीर चव्हाण आणि तांत्रिक आयुक्त डॉ. बिजू नायर हे सांभाळणार असून त्यांची या स्पर्धेत विशेष उपस्थिती असणार आहे. कराटे क्षेत्रातील दिग्गज आणि जगप्रसिद्ध गुरु हंशी भरत शर्मा हे या स्पर्धेचे मुख्य प्रेरणास्थान असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष आशीर्वादाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचे नाव आणि शिकवण खेळाडूंसाठी ऊर्जा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

​या राष्ट्रीय स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यात भारताच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यांमधील कसलेले कराटेपटू आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत. खेळाडूंच्या वयोगट आणि अनुभवानुसार सब-ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर आणि सिनिअर अशा चार स्तरांवर या स्पर्धा विभागल्या गेल्या आहेत. यामुळे लहान मुलांपासून ते अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वांनाच आपले कसब दाखवण्याची संधी मिळणार आहे. कराटे या स्वसंरक्षण कलेचा समाजात व्यापक प्रसार व्हावा आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा कराटे खेळाची शिस्त आणि ताकद प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असून, मुंबईकरांनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन शोतोकान कराटे युथ असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog