ब्रेकिंग न्यूज
🚨 डॉ. सचिन पोरे आणि इंजि. महेश चव्हाण यांची रायगड जिल्हा पर्यावरण समितीवर 'तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती... 🚨 अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचा ऐतिहासिक विजय; आरपीएफवर मात करत पटकावले विजेतेपद... 🚨

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा देणे हेच आमचे आद्य कर्तव्य!
रोहा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या मासिक सभेत अध्यक्ष पी.बी. सरफळे यांचे प्रतिपादन

रोहा-रायगड, दि. ६ (संदीप सरफळे) :- समाजाचा आधारस्तंभ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, संस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, वाढत्या वयानुसार ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक स्तरावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्यांना सर्वतोपरी मदत करून दिलासा देणे, हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे मत रोहा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पी.बी. सरफळे यांनी व्यक्त केले. रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मंडळाच्या मासिक सभेत ते बोलत होते.

​या सभेला ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष एस.एन. गायकवाड, सचिव सुरेश मोरे सर, खजिनदार प्रकाश पाटील यांच्यासह महंमदशेठ डबीर, शरद गुडेकर, अशोक जोशी, दत्तात्रेय तवटे, अनुराधा धुमाळ, शैलजा सुभाष देसाई, नंदकुमार भादेकर व शेखर गुंड यांसारखे मान्यवर आणि १०० हून अधिक सभासद उपस्थित होते.

​उपस्थितांना मार्गदर्शन करताना पी.बी. सरफळे यांनी संघटनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रवणयंत्रांचे वाटप, चालणे सुलभ व्हावे यासाठी वॉकर स्टिकचे वाटप आणि मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येते. अशा लोकोपयोगी कामांमुळे मनस्वी समाधान मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

​केवळ आरोग्यच नव्हे, तर प्रशासकीय आणि बँकिंग कामातही ज्येष्ठांना त्रास होऊ नये, यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. या संदर्भात माहिती देताना सरफळे म्हणाले की, त्यांनी स्वतः पदाधिकाऱ्यांसह स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बँकांमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सौजन्याची वागणूक मिळावी आणि त्यांची कामे प्राधान्याने व त्वरित पूर्ण केली जावीत, अशी सूचना केली. यावर दोन्ही बँकांच्या व्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्येष्ठांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

​सभेच्या समारोप प्रसंगी सरफळे यांनी संघटनेच्या व्यासपीठाचे महत्त्व अधोरेखित केले. जेव्हा ज्येष्ठ नागरिक एकत्र जमतात, तेव्हा विचारांची देवाणघेवाण होऊन एकमेकांच्या समस्या समजून घेता येतात. या समस्या सामंजस्याने सोडवल्या गेल्यामुळे ज्येष्ठांना मानसिक आधार आणि मोठा दिलासा मिळतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेमुळे उपस्थित सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Comments

Popular posts from this blog