कचरामुक्त नागोठणे संकल्पनेला सहकार्य करा
सरपंच सुप्रिया महाडिक यांचे नागरिकांना आवाहन
नागोठणे (महेंद्र माने) :- नागोठणे शहराला पूर्णपणे कचरामुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सुप्रिया महाडिक यांनी केले आहे. सोमवार, ३० मार्च रोजी येथील बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालयातील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अकलाक पानसरे, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे, संतोष नागोठणेकर, शबाना मुल्ला, भाविक गिजे, पूनम काळे, ज्योती राऊत, मंगी कातकरी आणि ग्राम अधिकारी राकेश टेमघरे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना सरपंच महाडिक यांनी सांगितले की, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आज नागोठणे शहर ७० टक्के कचरामुक्त झाले आहे. उर्वरित कचरा समस्या सोडवण्यासाठी मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करून घरातील सुका कचरा स्वतंत्र साठवावा आणि ओला कचरा घंटागाडीत द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. उपसरपंच अकलाक पानसरे यांनी स्पष्ट केले की, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून मोहिमेच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. ग्राम अधिकारी राकेश टेमघरे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापन उपायांची दखल जिल्हा परिषदेनेही घेतली आहे. सफाई कामगारांची संख्या मर्यादित असली तरी वाढत्या कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकतो, असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेचा समारोप आणि उपस्थितांचे आभार अकलाक पानसरे यांनी मानले.
Comments
Post a Comment