नवी मुंबईतील सीए निलेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या ‘आगरी व कोळी समाज सेल’च्या राज्यप्रमुख पदी नियुक्ती
उरण (विठ्ठल ममताबादे) :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” या नवीन सेलची स्थापना करण्यात आली असून, याच्या राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील आगरी-कोळी समाज हा पारंपरिक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून कोकण आणि विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात या समाजाची लोकसंख्या प्रभावी आहे. गेल्या पन्नास वर्षांत विविध प्रकल्पांमुळे येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या या समाजाला अनेक शासकीय, शैक्षणिक, रोजगार आणि सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या समस्या शासन व प्रशासकीय स्तरावर प्रभावीपणे मांडून त्या सोडवण्यासाठी पक्षाने या विशेष सेलची जबाबदारी आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या सीए निलेश पाटील यांच्या खांद्यावर सोपवली आहे. ही नियुक्ती ६ एप्रिल २०२६ रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. सीए निलेश पाटील यांच्यासारख्या सक्षम, अनुभवी आणि समाजकार्याची जाण असलेल्या नेतृत्वामुळे पक्ष आणि समाजाची प्रतिमा उंचावून समाजहिताची कामे अधिक निष्ठेने होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल निलेश पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment