ओएनजीसीकडून नवघर ग्रामपंचायतीला नवीन घंटागाडी सुपूर्द!
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
उरण (विठ्ठल ममताबादे) :- ग्रामपंचायत नवघर येथील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ओएनजीसी कंपनीने सीएसआर फंडातून एक नवीन घंटागाडी उपलब्ध करून दिली आहे. गावातील घनकचरा उचलण्यासाठी हक्काचे वाहन असावे, या उद्देशाने सरपंच आणि उपसरपंच यांनी दोन महिन्यांपूर्वी ओएनजीसी प्रशासनाकडे मागणी करून तसा ठराव मांडला होता. या मागणीचा शिवसेना शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे आणि नितीन मढवी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन घंटागाडीची निकड पटवून दिली, तसेच संबंधित एनजीओ संस्था आणि अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली.
या प्रयत्नांना यश येऊन सोमवार, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी ओएनजीसी प्लांटमध्ये या नवीन घंटागाडीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. ओएनजीसीचे प्लांट मॅनेजर एस. एन. अहमद (CGM) आणि सपोर्ट मॅनेजर एस. के. मोहन यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीचे उद्घाटन केले. यावेळी ओएनजीसीचे अधिकारी अभिषेक पाटील, सरपंच सविता मढवी, उपसरपंच प्रियदर्शनी म्हात्रे, नितीन मढवी, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, आतिश भोईर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांचा शाल आणि वृक्षारोपण करून सत्कार करण्यात आला. ही घंटागाडी उपलब्ध करून देण्यासाठी ओएनजीसीचे अधिकारी अभिषेक पाटील आणि भूमिका फाउंडेशनचे डॉ. विशाल गणर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल ग्रामपंचायतीने त्यांचे विशेष आभार मानले. तसेच, अविनाश म्हात्रे यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दलही त्यांचे कौतुक करण्यात आले. या नवीन घंटागाडीमुळे नवघर गावातील स्वच्छतेच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे.

Comments
Post a Comment