कर्जतच्या तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयात 'टेकसागर-२०२६' संपन्न
एआय हॅकाथॉनमध्ये यजमान कॉलेजसह पिल्ले कॉलेजची बाजी
नवी मुंबई (दिपक कायंदेकर) :- यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भिवपुरी येथे २३ आणि २४ मार्च २०२६ रोजी 'टेकसागर-२०२६' हा राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. या महोत्सवांतर्गत आयोजित २४ तासांच्या विशेष 'एआय हॅकाथॉन' स्पर्धेत पिल्ले कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला, तर यजमान तासगावकर महाविद्यालयाच्या वेदांत कायंदेकर आणि त्यांच्या ग्रुपने द्वितीय क्रमांकावर मोहर उमटवली.
या दोन दिवसीय महोत्सवात महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. हॅकाथॉनसह प्रोजेक्ट प्रदर्शन, तांत्रिक सादरीकरण आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कल्पकता आणि संशोधन कौशल्य मांडण्यासाठी एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल नवकल्पना यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचे आवाहन करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विशेष आकर्षण ठरलेल्या हॅकाथॉन स्पर्धेसाठी राज्यातील एकूण १८ गटांमधून ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दोन फेऱ्यांनंतर, तासगावकर महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या कुमार वेदांत दीपक कायंदेकर, ऋषिकेश काळोखे आणि पार्थ देशपांडे यांच्या गटाने 'फिन्लेन्स- फ्रॉड डिटेक्शन' हा प्रकल्प सादर करून परीक्षकांची मने जिंकली आणि द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. या यशाबद्दल त्यांना प्रमाणपत्र आणि १२,००० रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, अभ्यासात हुशार असलेला वेदांत हा कराटेमधील 'ब्लॅक बेल्ट' धारक असून तो योग आणि किक-बॉक्सिंगचे धडेही देतो.
या पारितोषिक वितरण समारंभास संस्थेचे प्रमुख डॉ. नंदकुमार तासगावकर, चांधई कॅम्पसचे सीईओ श्री. पराग ओला, श्री. अतुल म्हात्रे, प्राचार्य डॉ. निलेश पवार, उपप्राचार्य डॉ. हरीश बारापात्रे आणि प्रा. समाधान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले. या महोत्सामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना नवी दिशा मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Comments
Post a Comment