ब्रेकिंग न्यूज
🚨 राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड.!🚨

आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर यांचा प्रदीर्घ सेवेनंतर भावपूर्ण निरोप

जे. एम. म्हात्रे यांच्याकडून कार्याचा गौरव

उरण, दि. ३१ (विठ्ठल ममताबादे) :- शिक्षकाचे कार्य केवळ ज्ञानदान नसून खऱ्या अर्थाने देश घडविण्याचे आहे. शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो, तर तो समाजासाठी निरंतर मार्गदर्शक असतो. मोरा सारख्या दुर्गम भागातही अत्यंत निष्ठेने काम करून आदर्श विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी केले आहे, अशा शब्दांत जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी सुधीर मुंबईकर यांच्या कार्याचा गौरव केला. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विद्या संकुल, मोरा येथील मुख्याध्यापक सुधीर शांताराम मुंबईकर हे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित सेवापूर्ती सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

​सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी विद्या संकुलाच्या प्रांगणात शाळा समितीचे चेअरमन परशुराम मोतीराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी बोलताना जे. एम. म्हात्रे यांनी शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणावर चिंता व्यक्त केली आणि ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. सुधीर मुंबईकर यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा शाळेला मोठा फायदा करून दिला असून, निवृत्तीनंतरही त्यांनी शाळेला वेळोवेळी मार्गदर्शन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

​कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक मनोज म्हात्रे यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी मुंबईकर सरांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतला. यावेळी मुंबईकर यांच्या जीवनावरील लघुपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला, ज्याने उपस्थितांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे सुपुत्र प्रतीक मुंबईकर यांनी आपल्या वडिलांविषयीचा आदर व्यक्त केला, तर माजी विद्यार्थिनी स्वप्नाली हळदणकर यांनी सरांच्या संस्कारांमुळेच आज आम्ही घडलो असल्याची भावना व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक किरण शिंगटे, बी. पी. म्हात्रे आणि मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनीही मुंबईकर सरांच्या योगदानाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात परशुराम कोळी यांनी सांगितले की, सुधीर मुंबईकर यांनी शाळेला आपले घर मानून तिचे सुशोभीकरण आणि प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले, जे कधीही विसरता येणार नाही.

​सत्काराला उत्तर देताना सुधीर मुंबईकर भावुक झाले होते. चिरनेर, व्ही. के. हायस्कूल आणि मोरा येथील २८ वर्षे अशा एकूण ३६ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांना अश्रू अनावर झाले. जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे, सर्व पदाधिकारी, सहकारी शिक्षक आणि नातेवाईक यांच्या पाठिंब्यामुळेच मी ही प्रगती करू शकलो, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. 'विद्यार्थी हेच माझे दैवत आहेत आणि उद्यापासून त्यांची सेवा करता येणार नाही' या विचाराने ते गहिवरले. सुधीर मुंबईकर यांना त्यांच्या कारकीर्दीत रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार आणि द्रोणागिरी भूषण अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. सध्या ते उरण तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

​या सोहळ्याला न्हावाचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, शिक्षणाधिकारी निर्मला घरत, पी. एम. कोळी, चंद्रकांत कोळी, दिलीप मुंबईकर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व असलेल्या सुधीर मुंबईकर यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog