नागोठणे जुम्मा मशिदीत ईद-उल-फित्रचा उत्साह
पोलीस प्रशासनाकडून गुलाबपुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
नागोठणे, दि. २१ (सुहेल पानसरे) :- पवित्र रमजान महिन्याच्या उपवासांची सांगता झाल्यानंतर आज, शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी, नागोठणे शहरात ईद-उल-फित्रचा सण अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील ऐतिहासिक नागोठणे जुम्मा मशिदीमध्ये सकाळी ठीक ८:०० वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. या सामूहिक नमाजचे नेतृत्व मशिदीचे शाही इमाम जनाब जव्वाद मापकर यांनी केले. नमाज संपन्न झाल्यानंतर इमाम साहेबांनी उपस्थित भाविकांना खुतबाद्वारे धार्मिक मार्गदर्शन केले आणि त्यानंतर देश-दुनियेत शांतता व प्रगती नांदावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली.
दुआ आणि नमाजचा विधी पूर्ण झाल्यानंतर मशिद कमिटीच्या वतीने जनाब शब्बीर पानसरे यांनी उपस्थित संपूर्ण जमातुल मुस्लिमीनला ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागोठणे पोलीस स्टेशनने आपल्या सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवली. नमाज आटोपून बाहेर येणाऱ्या प्रत्येक नमाजीला पोलीस प्रशासनाच्या वतीने गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करण्यात आले. नागोठणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन केले.
मशिदीच्या परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. नमाज पठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन करून आणि गळाभेट घेऊन 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा दिल्या. केवळ मुस्लिम बांधवच नव्हे, तर इतर समाजातील नागरिकांनीही मशिदीबाहेर येऊन आपल्या मित्रपरिवाराला ईदच्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे नागोठणे शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे एक आदर्श दर्शन सर्वांना घडले.


Comments
Post a Comment