ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
शेलघरच्या 'एम जी ट्रॉफी'त माजी भारतीय डावखुरे फिरकी गोलंदाज निलेश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती
उरण, दि. ३१ (विठ्ठल ममताबादे) :- पनवेल तालुक्यातील शेलघर येथे सध्या प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे म्हणजेच 'एम जी ट्रॉफी'चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विजेत्यांना बक्षीस म्हणून दिल्या जाणाऱ्या २१ बाईक्स, ज्यामुळे ही स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या ऐतिहासिक क्रीडा सोहळ्याला भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज डावखुरे फिरकी गोलंदाज निलेश कुलकर्णी यांनी उपस्थिती लावून स्पर्धेची शोभा वाढवली. त्यांच्या आगमनामुळे शेलघरच्या मैदानावर एक वेगळाच उत्साह संचारला असून क्रिकेट शौकिनांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे.
​निलेश कुलकर्णी यांनी १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर गडी बाद (विकेट) करणारे ते पहिले भारतीय गोलंदाज ठरले होते, हा जागतिक विक्रम आजही त्यांच्या नावे आहे. तसेच मुंबई संघाकडून खेळताना त्यांनी बडोद्याविरुद्ध अवघ्या १२० धावांत १० बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. अशा या अनुभवी डावखुरे फिरकी गोलंदाजाचे स्वागत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शनिवारी रात्री फटाक्यांच्या भव्य आतषबाजीत केले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन निलेश कुलकर्णी यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
​यावेळी उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांशी संवाद साधताना निलेश कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खेळ कोणताही असो, त्यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करायला सदैव तयार आहे, असे सांगून त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'एम जी ट्रॉफी'च्या आयोजनाचे आणि भव्य मैदानाचा गौरव केला. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी होत असलेले हे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
​आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना कुलकर्णी म्हणाले की, कोणत्याही प्राथमिक सुविधा उपलब्ध नसतानाही आम्ही केवळ क्रिकेटवर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी दिवसरात्र मेहनत केली. त्याकाळी खेळाच्या ओढीने तहानभूकही जाणवत नसे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात केल्यामुळेच मी भारतीय संघात स्थान मिळवू शकलो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. निवृत्तीनंतरही आपण आजही क्रिकेटची सेवा करत असून नवनवीन खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेलघरमधील या भव्य स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळत असून, या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

Comments

Popular posts from this blog