www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com

भातसईच्या श्री महादेवी मातेचा वार्षिक यात्रोत्सव

 'गळ लावणे' विधी : यात्रेचे मुख्य आकर्षण 

रोहा, दि. २९ मार्च (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भातसई येथे श्री महादेवी मातेचा पारंपरिक पालखी आणि यात्रा सोहळा येत्या मंगळवारी ३१ मार्च आणि बुधवारी १ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या दोन दिवसीय उत्सवासाठी भातसईसह पंचक्रोशीतील भाविक सज्ज झाले असून प्रशासकीय स्तरावरही जय्यत तयारी करण्यात आली आहे.

​या उत्सवामागील पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी अत्यंत रंजक आहे. अनेक वर्षांपूर्वी भातसई गावातील एक गुराखी मिठकेश्वर जाळी परिसरात गाई चरावयास गेला असता, त्याला महादेवी मातेचे प्रत्यक्ष दर्शन झाले. देवीने स्वतः गावाच्या पूर्व दिशेला असलेल्या माळावर आपले वास्तव्य असल्याचे सांगितले, त्यामुळेच या स्थानाला 'स्वयंभू स्थान' म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या देवीच्या शक्तीचा प्रत्यय केवळ भाविकांनाच नाही, तर ऐतिहासिक काळात यात्रेला विरोध करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाही आला होता, तेव्हापासून या उत्सवाला अधिकृत मान्यता मिळून तो अविरतपणे सुरू आहे.

​नियोजनानुसार, मंगळवारी, दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता भातसई येथील येशी मंदिरातून श्री महादेवी मातेच्या पालखी मिरवणुकीला भक्तीमय वातावरणात सुरुवात होईल. ही पालखी झोलांबे, कोपरे आणि लक्ष्मीनगर या शेजारच्या गावांमधून मार्गक्रमण करत सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा भातसईमध्ये दाखल होईल. त्यानंतर ही पालखी गावातील प्रत्येक घरासमोर दर्शनासाठी नेली जाणार असून, भाविकांच्या भेटीनंतर ती मूळ महादेवी मंदिरात विसावेल.

​यात्रेचा मुख्य दिवशी बुधवारी, १ एप्रिल रोजी असून सकाळपासूनच रायगड जिल्हा आणि राज्याच्या इतर भागांतून भाविक नवस फेडण्यासाठी वाजतगाजत मंदिरात दाखल होण्यास सुरुवात होईल. देवीचे भगत चिंतामणी सखाराम खरीवले आणि त्यांचे कुटुंब या परंपरेचे जतन करत असून, त्यांच्यामध्ये देवीचा संचार होतो अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. यात्रेच्या दिवशी परिसरात मिठाई, खेळणी आणि इतर साहित्यांची मोठी दुकाने थाटली जातात, ज्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप येते.

​या यात्रेचे सर्वात महत्त्वाचे आणि थरारक वैशिष्ट्य म्हणजे 'गळ लावणे' हा धार्मिक विधी. हा विधी बुधवार सायंकाळी ५:३० वाजता पार पडणार आहे. यंदा सहा भाविकांना गळ लावण्यात येणार असून, त्यातील एका भक्ताला वरचा गळ लावून लाटेला लटकवून फिरवण्याची पारंपरिक प्रथा पूर्ण केली जाईल. या सोहळ्यासाठी निडी, कोपरे, झोलांबे, लक्ष्मीनगर, वरवडे, पाले आणि आरे बुद्रुक या गावांतील मानाच्या काठ्या मिरवणुकीने सहभागी होणार आहेत. चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर होणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Comments

Popular posts from this blog