ब्रेकिंग न्यूज
🚨 राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड.!🚨

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण ८४ हजार ८१७ प्रकरणे निकाली 

३६ कोटी ४६ लाख ६१ हजार ४२९ रुपयांची तडजोड

रायगड - अलिबाग, दि. १७ (प्रतिनिधी) :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने   प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग,राजेंद्र द. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ मार्च, २०२६ रोजी  जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उदघाटन  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र द. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. 

उद्घाटन प्रसंगी अलिबाग येथील न्यायिक अधिकारी, वकिल संघटना अध्यक्ष श्री प्रसाद पाटील, सचिव श्री. अमित देशमुख तसेच दृकश्राव्य माध्यमाव्दारे संपूर्ण रायगड जिल्हयातील न्यायिक अधिकारी, तालुका वकिल संघटनेतील वकिल वर्ग व पक्षकार मोठ्‌या संख्येने उपस्थित होते.

 लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण ८४ हजार ८१७ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  राजेंद्र द. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये रायगड जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ५१० वादपूर्व प्रकरणे व १९ हजार ४ प्रलंबित अशी एकूण १ लाख ४१ हजार ५१४ प्रकरणे लोक न्यायालयामध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७८ हजार ३२४ वादपूर्व प्रकरणे व ६ हजार ४९३ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ८४ हजार ८१७ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोकन्यायालयामध्ये निकाली निघाली असून तडजोडीची एकूण रक्कम रुपये ३६ कोटी ४६ लाख ६१ हजार ४२९ एवढी झाली आहे. लोकअदालतीमध्ये अलिबाग वकील संघटना व रायगड जिल्हयातील सर्व तालुका वकील संघटना यांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला.

सहा जोडप्यांचा लोक न्यायालयामध्ये संसार जुळला

रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात ६ जोडप्यांचा (पेण-१, पाली-१, पनवेल-२, अलिबाग-२) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश  राजेंद्र द. सावंत यांनी मनोमिलन झालेल्या जोडप्यांचे अभिनंदन केले.

मोटार अपघात प्रकरणांमध्ये एकूण रुपये ५ कोटी ६८ लाख ७९ हजार इतकी नुकसान भरपाई मंजूर

जिल्ह्यामध्ये एकूण ६० मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना ५ कोटी ६८ लाख ७९ हजार इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत २७ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक न्यायालयामध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुन सुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली.

या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, न्यायिक कर्मचारी वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  राजेंद्र. द. सावंत यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog