नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्याकडून वाढदिवसाचा अनोखा सामाजिक संदेश
नगराध्यक्षांच्या आवाहनाला रोहेकरांचा प्रतिसाद; शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
रोहा, दि. २२ (प्रतिनिधी) :- समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांनी आपला वाढदिवस अत्यंत विधायक पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून समाजाला मदत करण्याच्या हेतूने त्यांनी सर्व रोहेकर नागरिकांना बॅनर न लावण्याचे आणि पुष्पगुच्छांऐवीजी शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन केले होते. नगराध्यक्षांच्या या सकारात्मक आवाहनाला रोहेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शैक्षणिक साहित्य भेट दिले. या सर्व शैक्षणिक साहित्याचे रोह्यातील विविध शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत रोहा नगर परिषद शाळा क्रमांक १, ३, ४, ५, ६, ९, १० आणि डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच रोहा उर्दू शाळा, अष्टमी उर्दू शाळा, गोरोबानगर, सिद्धार्थनगर आणि नेहरूनगर येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही या मदतीचा लाभ मिळाला. शैक्षणिक साहित्यासोबतच रोहा तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या फर्स्ट एड किटचेही यावेळी वितरण करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत झाली असून, साहित्याचे वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे खरे यश असल्याचे समाधान नगराध्यक्षांनी व्यक्त केले.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी नगराध्यक्षांसोबत सभापती महेश कोल्हटकर, नगरसेविका सौ. संजना शिंदे, सौ. नीता हजारे, फराह पानसरे, अफरीन रोगे तसेच सौ. समिधा अष्टीवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव साळवी, पायल शेडगे, दत्तात्रेय घरदाले, महेश शेडगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सामाजिक भान जपल्याचा हा आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.
Comments
Post a Comment