ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

भव्य क्लॉक टॉवर आणि हायटेक 'नमो उद्यान' 

रोहा नगरपालिकेचा कायापालट करणारा ऐतिहासिक सोहळा

रोहा, दि. २३ (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्यातील राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या रोहा शहराच्या सौंदर्यात आणि नागरी सुविधांमध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा रविवारी, २२ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने रोहेकरांच्या स्वप्नपूर्तीला नवी दिशा दिली आहे. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते अंतर्गत वस्त्यांपर्यंत सर्वांगीण विकासाचे जाळे विणण्यासाठी नगरपालिकेने उचललेले हे पाऊल भविष्यात रोह्याची नवी ओळख निर्माण करणारे ठरणार आहे.

​कार्यक्रमाची सुरुवात फिरोज टॉकीज ते धावीर मंदिर या नागरी दलितवस्तीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या लोकार्पणाने झाली. विशेष म्हणजे, प्रशासकीय तत्परता आणि नियोजनाच्या जोरावर ४० लाख रुपये खर्चून करण्यात आलेले हे रस्ते काम अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात आले, ज्याचे कौतुक मंत्री महोदयांनी आवर्जून केले. यानंतर बायपास रोडवर उभारण्यात येणाऱ्या १८ मीटर उंच 'क्लॉक टॉवर' आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या 'नमो उद्याना'चे भूमिपूजन करण्यात आले. नमो उद्यानाच्या माध्यमातून शहरात एक 'ग्रीन झोन' तयार केला जाणार असून, तिथे अत्याधुनिक प्रकाशयोजना, चोवीस तास सीसीटीव्ही निगराणी आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या कलाकृती उभारल्या जाणार आहेत.

​आपल्या अध्यक्षीय भाषणात ना. आदिती तटकरे यांनी रोहा नगरपालिकेच्या कामकाजाचे आणि दूरदृष्टीचे कौतुक केले. नगराध्यक्षांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी जाहीर केले की, उद्यानाच्या दर्शनी भागात स्थानिक व्यावसायिकांसाठी स्टॉल उभारण्याकरिता ३५ ते ४० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, केवळ पायाभूत सुविधांवरच नव्हे तर शैक्षणिक व आरोग्य सुविधेवर भर देत, शहरातील सर्व अंगणवाड्या 'स्मार्ट' करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी दिले. यामुळे रोह्यातील चिमुकल्यांनाही आता आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत.

​नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे यांनी आपल्या प्रास्ताविकात या सर्व विकासकामांचा आराखडा मांडला. त्या म्हणाल्या की, "रोहा शहराला एक स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी खासदार सुनील तटकरे आणि ना. आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत." १ कोटी २६ लाख रुपये खर्चून उभारला जाणारा हा क्लॉक टॉवर भारतातील मोजक्या 'क' वर्ग नगरपालिकांमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. १८ मीटर उंचीच्या या टॉवरवल लावलेल्या घड्याळाची वेळ नागोठणे, कोलाड आणि मुरुड या तिन्ही दिशांकडून येणाऱ्या प्रवाशांना तसेच स्थानिक बाजारपेठेत येणाऱ्या प्रत्येकाला पाहता येईल. पुढील सहा महिन्यांत या टॉवरचे काम पूर्ण होऊन ते पर्यटनाचे एक मुख्य केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

​या भव्य सोहळ्याला नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, गटनेते महेंद्र गुजर, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, निता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, शहर अध्यक्ष अमित उकडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मोठ्या संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते. या विकासकामांच्या शुभारंभामुळे शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी काळात रोहा हे रायगडमधील एक 'मॉडेल सिटी' म्हणून उदयास येईल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog