ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨


महावीर जयंतीनिमित्त मांसविक्री बंद ठेवण्याची जैन संघटनेची मागणी 

आगरी डॉन लिलाधर मोरेंनी व्यक्त केला आक्षेप

​रोहा, दि. २९ (प्रतिनिधी) :- रोहा शहरात महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मांसविक्री बंद ठेवण्याबाबत भारतीय जैन संघटना, रोहा-रायगड यांच्या वतीने नुकतेच रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, भगवान महावीर यांची जयंती ही जैन समाजासाठी आणि सर्व प्राणीमात्रांसाठी अत्यंत पवित्र असून या दिवशी अहिंसेचा संदेश दिला जातो. महावीरांच्या 'जगा आणि जगू द्या' या तत्त्वाचे पालन करण्यासाठी आणि या पवित्र दिवशी होणारी हिंसा रोखण्यासाठी रोहा कार्यक्षेत्रातील सर्व कत्तलखाने, मांस आणि चिकन-मटण विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती जैन संघटनेने प्रशासनाला केली आहे.

​मात्र, जैन संघटनेच्या या भूमिकेवर 'आगरी डॉन' म्हणून प्रसिद्ध असलेले लिलाधर लक्ष्मण मोरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोरे यांनी स्पष्ट केले की, जैन बांधवांनी नगरपालिकेला निवेदन दिले असले आणि त्यावर नगरपालिका कोणताही निर्णय घेणार असली तरी आम्हाला त्याने काहीही फरक पडत नाही. मात्र, आमचा आगरी-कोळी बांधव ज्यांना त्या दिवशी मांसाहार करण्याची इच्छा असेल, तो मांस-मच्छी खाणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आम्ही आमच्या राज्यात स्वतंत्र आहोत आणि अशा प्रकारचे निर्बंध किंवा आदेश आमच्याकडे चालणार नाहीत, असे म्हणत त्यांनी या मागणीला कडाडून विरोध दर्शवला आहे. "हे आदेश तुमच्या गुजरात राज्यात लावा, तिथे आमची काही हरकत नाही, परंतु येथे ते लादले जाऊ नयेत," अशा शब्दांत लिलाधर मोरे यांनी आपली भूमिका मांडल्याने आता या प्रकरणावरून शहरात चर्चांना उधाण आले आहे.

Comments

Popular posts from this blog