🚨 जालना : बसस्टॅन्ड रोड वरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा; ७ पुरुष आरोपी जेरबंद, १३ पीडीत महिलांची सुटका... 🚨 सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा झरे येथील लॉकर गॅस कटरने कापुन केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना उत्तर प्रदेश राज्यातून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई... 🚨 लातूर : ६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी आरोपीला अटक; संगनमताने चोरीचा बनाव उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई... 🚨

'शाहिरी शिवगर्जना' कार्यक्रमाला अहिल्यानगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवरायांच्या शौर्यगाथेने दुमदुमले माऊली सभागृह

​अहिल्यानगर, दि. १९ (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जागर करणारा 'शाहिरी शिवगर्जना' हा सांस्कृतिक कार्यक्रम सावेडी येथील माऊली सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग (मुंबई) व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी करत शिवचरित्राला भरभरून दाद दिली.

​तहसीलदार नागेश गायकवाड, तहसीलदार स्वप्नील ढवळे, हिमालय घोरपडे, महानगरपालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

​कार्यक्रमात प्रसिद्ध शाहीर सुमित धुमाळ व त्यांच्या १० सहकलावंतांच्या चमूने शिवरायांचे शौर्य, स्वराज्यनिर्मितीचा ध्यास, लोककल्याणकारी शासन आणि पराक्रमाच्या ऐतिहासिक घटनांचे प्रभावी सादरीकरण केले. शाहिरी पोवाडे, शिवगीते, पारंपरिक वाद्यांची साथ आणि ओजस्वी आवाजातील गजर यामुळे संपूर्ण सभागृहात शिवमय वातावरण निर्माण झाले.

​शिवरायांच्या जन्मापासून स्वराज्यस्थापनेपर्यंतचा प्रेरक प्रवास, शिवरायांचा लोकाभिमुख कारभार अशा विविध प्रसंगांवर आधारित सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. प्रत्येक पोवाड्यानंतर सभागृहात “जय भवानी, जय शिवाजी”चा गजर दुमदुमून गेला.

​कार्यक्रमात अहिल्यानगर येथील स्थानिक कलाकारांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध नाट्यछटा, नृत्यप्रकार व शिवगीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ओमकार देशमुख या चिमुकल्या मावळ्याने सादर केलेला पोवाडा तसेच ध्वज विराज मुनोत व काव्या भालेराव या बाल कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीच्या नियोजनावर पोवाडा सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. 

नृत्य झंकारच्या कलाकारांनी शिवरायांच्या शौर्यावर आधारित नृत्य सादर केले. व्हिक्टर डान्स अकादमीच्या कलाकारांनी शिवजन्मोत्सवावर नृत्यगीत तसेच प्रतापगडाचा रणसंग्राम यावर आधारित लघुनाट्य सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या कलाकारांचे कौतुक केले.

​या कार्यक्रमामुळे युवक-युवतींमध्ये शिवरायांच्या विचारांचे आणि स्वराज्याच्या मूल्यांचे महत्त्व अधिक दृढ झाले. शिवाजी महाराजांचे नेतृत्व, धैर्य, शिस्त, प्रशासनकौशल्य आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका या सर्वांचा संदेश उपस्थितांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

​‘शाहिरी शिवगर्जना’ या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला. शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आणि स्वराज्याची प्रेरणा नागरिकांच्या मनात अधिक दृढ करून कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog