ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली वाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

पनवेल, दि. १९ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली वाडी येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जांभिवली वाडीवर पहिल्यांदाच शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते. दोन दिवसापासूनच राजे छत्रपतींच्या जयंतीची विद्यार्थी अतिशय उत्साहाने पूर्वतयारी करीत होते. या निमित्ताने संपूर्ण शाळेचा परिसर रांगोळ्या व तोरणे यांनी सजवला होता. सर्वप्रथम सकाळी ९ वाजता शिवछत्रपतींची  भव्य मिरवणूक संपूर्ण जांभिवली वाडीच्या परिसरातून ढोल ताशांच्या गजरात काढली होती. मिरवणूक पाहण्यासाठी ठीक ठिकाणी लोकांनी गर्दी केली होती. संपूर्ण गावात फिरून झाल्यानंतर मिरवणूक पुन्हा शाळेमध्ये आणली आणि तेथे मिरवणुकीची  सांगता झाली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते राजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. उपस्थितांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळेच्या लहान विद्यार्थिनींनी राजांच्या जीवनावर आधारित गाणी म्हटली.शिवरायांचे बाळपण जागे करण्यासाठी सुंदर अशा राजांच्या पाळण्यावर नृत्य करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यानंतर शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती ज्योती भोपी यांनी शिवरायांच्या बालपणीची व त्यांच्या पराक्रमाविषयीची माहिती सांगितली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा शिवरायांच्या पराक्रमाविषयी माहिती सांगितली. तसेच शिवरायांचे असणारे गुण आजच्या पिढीसाठी किती जरुरीचे आहेत, आपण त्याचे कशाप्रकारे पालन करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. शेवटी शाळेच्या उपशिक्षिका ज्योती भोपी यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची अतिशय उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली येथील माजी सरपंच श्रीमती देवकी महादू निकम, अंगणवाडी सेविका सौ.हिरा निकम, मदतनीस सौ. अस्मिता कोंडीलकर, स्वयंपाकी म्हणून काम पाहणाऱ्या सौ. रसिका कोंडीलकर, स्वयंपाकी मदतनीस पारूबाई, प्रेरणा संस्थेच्या मार्गदर्शक ताई श्रीमती संजीवनी रायकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य तसेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. अशा प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम शाळेत होत असल्याने सर्व पालक वर्ग अतिशय आनंदित होता. अशा या गोड दिवसाचा शेवट विद्यार्थ्यांना व पालकांना खाऊ वाटप करून करण्यात आला. अशा प्रकारचा उत्तम कार्यक्रम शाळेत सादर केल्याने परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog