बीज मोदक रंगावलीतून श्रीगणेशाची पर्यावरणपूरक आराधना
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाने या वर्षीचा श्रीगणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले असून या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका वैविध्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील नागरिक व स्वयंसेवी संस्था यांचाही उत्साही सहभाग लाभत आहे.
अशाच प्रकारचा ‘बीज मोदकांची रंगावली’ हा अभिनव उपक्रम प्रभात ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असून या पर्यावरणशील उपक्रमामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने पाठिंबा देत सहभाग घेतला आहे. याअंतर्गत 28 ऑगस्ट रोजी घणसोली रेल्वे स्थानकाच्या आत विस्तारित मोठया जागेत 3 हजारहून अधिक बीज मोदकांची भव्यतम रांगोळी साकारण्यात आली असून 28 व 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे रविवार दि. 31 ऑगस्ट व सोमवार दि. 1 सप्टेंबर रोजी कोपरखैरणे रेल्वे स्थानकात आणि बुधवार दि. 3 सप्टेंबर व गुरुवार दि. 4 सप्टेंबर रोजी वाशी रेल्वे स्थानकात बीज मोदकांची रंगावली साकारली जाणार आहे.
15 फूट x 10 फूट आकाराची ही भव्यतम बीज मोदक रंगावली प्रभात महिला बचत गटाच्या सदस्यांनी साकारली असून त्यामध्ये 3 हजारहून अधिक बीज मोदकांचा उपयोग केला गेला आहे. सकाळी 8 ते 10 या वेळेत प्रभात ट्रस्टचे स्वयंसेवक याठिकाणी थांबून स्वच्छता, कचरा वर्गीकरण, पर्यावरण रक्षण, प्लास्टिकचे धोके, नेत्रदान, अवयवदान याविषयी माहिती देत जनजागृती करणार असून बीज मोदक संकल्पनेचे महत्वही सांगणार आहेत. देशी वृक्ष रोपांची बीजे तंतूमय कपडयाने लपेटून त्यावर मोदकाच्या आकाराचे मातीचे लिंपण करुन हे बीज मोदक प्रभात महिला बचत गटाच्या माध्यमातून बनविले जात असून हे बीज मोदक मोकळया जागी जमिनीत टाकल्यानंतर त्यामधून वृक्षसंपदा वाढीसाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व या माध्यमातून मोठया प्रमाणात वृक्षारोपण केले जावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून ज्या ठिकाणी नागरिकांची मोठया संख्येने वर्दळ असते अशी रेल्वे स्टेशनची निवड करुन त्याठिकाणी बीज मोदकांची रंगावली साकारली जात असल्याचे प्रभात ट्रस्टचे प्रमुख डॉ.प्रशांत थोरात यांनी सांगितले आहे.
बीज मोदकाच्या माध्यमातून निसर्गाशी नाते जपण्याचा प्रयत्न केला जात असून गणेशोत्सवाच्या सांगता दिनी अर्थात अनंत चतुर्थीच्या दिवशी दि. 6 सप्टेंबर रोजी महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर आलेल्या भाविकांना “निरोपाला रोप” या अभिनव संकल्पनेव्दारे बीज मोदकांचे वितरण केले जाणार आहे. माझी वसुंधरा अभियानात नवी मुंबई शहर क वर्ग महानगरपालिकांमध्ये प्रथम स्थानावर असून या उपक्रमांच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धनाच्या चळवळीला गती दिली जात आहे.

Comments
Post a Comment