रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत व जमीन कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात
बिल्डरचे नातेवाईकच बँकेचे डिफॉल्टर; ठेवीदारांचा आक्रोश आणि न्यायासाठी भागधारकांची धावाधाव
निविदा प्रक्रियेत झोल
रोहा (विशेष प्रतिनिधी) :- रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत व जमिनीची किंमत चार कोटी असताना अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयांत तिचा व्यवहार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा व्यवहार संशयास्पद असून त्याची चौकशी करून व्यवहार तात्काळ रद्द करावा तसेच याबाबत अडकलेल्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ठेवीदार आणि भागधारकांनी जिल्हा निबंधकांकडे केली आहे.
एकेकाळी जिल्ह्यात अग्रगण्य असलेली रोहा अष्टमी अर्बन बँक थकीत कर्जदारांमुळे घरघर लागुन 2007 साली अवसायानात निघाली. 12010 शेअर होल्डर असलेल्या रोहा अष्टमी अर्बन बँकेकडून आजमितीला ठेवीदारांचे वीस कोटी रुपये देणे बाकी आहे, रोहा अष्टमी नगर परिषदेचे दोन कोटी 38 लाख रुपये देणे बाकी आहे, इतर बँक व छोट्या पतसंस्था यांची साडेचार कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. ठेवीदारांची देणी, भागधारक तसेच इतर बँकांची देणी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गेल्या महिन्यात कस्टोडीअन यांनी रोहा अर्बन बँकेच्या मुख्यालयाचा लिलाव केल्याचे उघडकीस आले. लिलाव प्रक्रियेत शासन नियमांची पायमल्ली करून चार कोटी रुपयांची इमारत व जमीन अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयांत विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. निविदा प्रक्रियेत सुद्धा अटी शर्तींचा भंग झाला असून धक्कादायक बाब म्हणजे टेंडर घेणाऱ्या बिल्डरचे आईवडील व नातेवाईक बँकेचे डिफॉल्टर आणि थकीत कर्जदार आहेत.
निविदा प्रक्रियेत झोल
स्थानिक वृत्तपत्राच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या आणि रोहा परिसरात वितरण न होणाऱ्या वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केल्या. बॅंकेचे 12010 शेअर होल्डर असून बॅंकेची शिल्लक राहिलेली एकमेव मालमत्ता विक्री करताना सर्वांना अंधारात ठेवून लपून-छपून व्यवहार झाला आहे. ऑनलाइन निविदेमध्ये नमूद केलेल्या कालावधीत बँकेच्या खात्यात टेंडर फॉर्म विकत घेणाऱ्या कुठल्याही निविदा धारकाचे पैसे जमा झालेले नाहीत. तसेच इसारा रक्कमही भरली गेलेली नाही. असे असताना कस्टडीयनने उशीराने आलेली निविदा मंजूर केली आहे. निविदा मंजूर होताच निविदा धारकाने निविदेच्या 15 टक्के रक्कम निवेदेमध्ये नमूद केलेल्या खात्यात भरणा करणे गरजेचे होते. निविदाधारकाने अद्याप अशी कोणतीही रक्कम बँक खात्यात जमा केलेली नाही. मंजूर निविदाधारक बिल्डरचे आई-वडील व इतर नातेवाईक थकीत कर्जदार असून डिफॉल्टर आहेत. इमारत व जमिनीचे बाजार मूल्य चार कोटी रुपये असताना केवळ एक कोटी दहा हजार रुपयांत बँकेची विक्री केली आहे. मुख्यालय ही बँकेची शेवटची मालमत्ता असून आजमितीला इतर बँक, लहान पतसंस्था आणि ठेवीदारांचे 20 कोटी रुपये देणे अद्याप बाकी आहे.
रोह्याच्या बाजारपेठेमध्ये मुख्य रस्त्याला लागून असलेली मौल्यवान जागा आणि इमारत बिल्डरच्या घशात घालण्यासाठी कस्टोडीयनने लपून-छपून व्यवहार केलेला आहे. कायद्याच्या अमेंडमेंड मध्ये अशी विक्री करताना सर्व ठेवीदारांना पुर्वसुचना देणे बंधनकारक असताना या व्यवहारामध्ये भागधारकांची आणि ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे. संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून या निविदा प्रक्रियेला रोहीकरांची सक्त हरकत आहे. या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर आव्हान देऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- ॲड. महेंद्र पाटील, माजी चेअरमन
रोहा अष्टमी अर्बन बँक